हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

459

हिंगोली शहरासह जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी आणि हिंगोली या तीन तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 25 मार्चच्या रात्री जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह गहू, हरभरा, हळद या शेत पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल पाच हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात 25 मार्च सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली. हिंगोली शहरातील अकोला बायपास, खटकाळी बायपास, नांदेड नाका तसेच सर्व भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यासोबतच तालुक्यातील अंधारवाडी, बासंबा, भांडेगाव, सावा यासह अन्य गावात पावसाने जोरदार हजेरी लावली. कळमनुरी व सेनगाव तालुक्याच्या काही भागातही अवकाळी पाऊस बरसला. हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतशिवारामध्ये गहू, हळद व हरभरा या पिकांच्या काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या अवकाळी पावसाने खळे करून ठेवलेल्या शेतमालाचे व काढणी शिल्लक असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही भागात फळबागांचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या