महाराष्ट्राच्या प्राचीन वैभवाचा भाष्यकार हरपला, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. रामचंद्र मोरवंचिकर यांचे निधन

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि लेखक डॉ. रामचंद्र श्रीराम मोरवंचिकर यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. रामचंद्र मोरवंचिकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी रात्री 11 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. प्रसिद्ध चिकित्सक डॉ. विकास रत्नपारखे हे त्यांचे सुपुत्र आहेत.

डॉ. मोरवंचिकर यांनी इतिहास आणि संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे ते माजी प्रमुख आणि पर्यटन प्रशासन विभागाचे माजी संचालक होते. त्यांना सुमारे 40 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव होता. त्यांनी इतिहासावर आधारित 16 पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे 200 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण केले.

डॉ. मोरवंचिकर यांनी ‘एलोरा-संभाजीनगर महोत्सवा’चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच, ‘भारतीय जल संस्कृती परिषदे’चे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. पैठण येथील पुरातत्व उत्खननात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यातून महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे दुवे समोर आले. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.