
लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) सहाव्या हंगामात यंदा पहिल्यांदाच हिंदुस्थानी क्रिकेटपटू मैदानात उतरणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली. या घोषणेनंतर संपूर्ण क्रिकेटविश्वात आणि विशेषतः उपखंडातील चाहत्यांमध्ये उत्साहाला नवे उधाण आले आहे. हा रोमांचक हंगाम 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. एकूण 24 सामने खेळवले जाणार असून त्यात 20 साखळी सामने आणि 4 नॉकआउट सामने असतील. हे सर्व सामने कोलंबोतील प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडीतील पल्लेकल क्रिकेट स्टेडियम आणि दांबुल्यातील रंगिरी दांबुला स्टेडियम या प्रमुख ठिकाणी पार पडतील. आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, पहिल्यांदाच हिंदुस्थानातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. यामुळे केवळ एलपीएलच्याच नव्हे, तर संपूर्ण उपखंडातील क्रिकेटप्रेमींना या हंगामाची नवी उत्सुकता लागली आहे.



























































