
>>राजेश चुरी
मंत्रालयातील दफ्तर दिरंगाईचा फटका गडकिल्ल्यांवरील एका फ्रेंच अभ्यासकाच्या ‘गाईडबुक’ला बसला होता. गडकिल्ल्यांवरील एका फ्रेंच अभ्यासकाचे धाराशीवमधील बुलंद नळदुर्ग किल्ल्यावरील गाईडबुक तयार झाले होते; पण सहाय्यक डेस्क ऑफिसरच्या एका ‘निगेटिव्ह रिमार्प’मुळे हे पुस्तक तीन वर्षांपासून बासनात पडून होते. मात्र आता सांस्पृतिक विभागाच्या पुढाकाराने फ्रेंच नगररचनाकाराच्या नजरेतून टिपलेला नळदुर्गच्या स्थापत्यशास्त्राचा इतिहास नव्याने जगासमोर येणार आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची भुरळ इतिहासप्रेमींप्रमाणे फ्रान्समधील एक नगररचनाकाराला पडली. मध्यमयुगीन गडकिल्ल्यांवर खास करून आधुनिक लष्करी किल्ल्यांची वास्तुकला व स्थापत्यशास्त्रावर अभ्यास करणारे डॉ. निकोलस मॉर्ले हे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची मुशाफिरी करत धारशीवमधील नळदुर्ग किल्ल्यावर पोहोचले. त्यांच्या नजरेतून किल्ल्याचे बारकावे टिपले. अभ्यास आणि प्रचंड मेहनतीने किल्ल्याच्या मुख्य दरवाजापासून, किल्ल्याचे अभ्यासपूर्ण टिपण (नोट) तयार करून महाराष्ट्र राज्याच्या पुरातन वास्तू व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला पाठवली.
दोन–तीन वर्षे बासनात
मंत्रालयातील निगेटिव्ह रिमार्प व दफ्तर दिरंगाईमुळे पुस्तकाचा प्रस्ताव बासनातच पडून होता. राज्य पुरातन वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी ही बाब मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व सांस्पृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या निदर्शनास आणली. या दोघांनीही या पुस्तकाचे महत्त्व ओळखले आणि हा प्रस्ताव मार्गी लावण्याचे तत्त्वतः मान्य केले. त्यामुळे फ्रेंच अभ्यासकाच्या नजरेतून टिपलेला नळदुर्गच्या स्थापत्यशैलीचा नमुना जगातील गडकिल्ल्यांच्या अभ्यासकांसमोर पुस्तकरूपातून लवकरच येणार आहे.