शाक्त, शक्ती आणि चैतन्य

894

>> आशुतोष बापट

जगातील सर्वच संस्कृतींमध्ये शक्तिपूजा केल्याचे दिसते. तिचे स्वरूप वेगवेगळे असू शकेल. त्यांची नावे वेगवेगळी असतील, परंतु शक्ती, सामर्थ्य यांचे पूजन सर्वत्र लोकप्रिय आहे. स्त्रीदेवतांची पूजासुद्धा मानववंश सातत्य आणि वंशवृद्धी तसेच सामर्थ्यवृद्धी याकरिता आवर्जून केली जाते. नवरात्रात बसवले जाणारे घट हेसुद्धा नवनिर्मितीचेच प्रतीक आहे. 

शक्तीचा, सृजनाचा, चैतन्याचा महोत्सव नवरात्र आजपासून सुरू झाला. आजपासून पुढचे नऊ दिवस शक्तिदेवतेचे पूजन आणि गुणगान मोठय़ा उत्साहात केले जाते. आदिम काळापासून होत असलेली शक्तीची उपासना केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगभर सर्वत्र पाहायला मिळते. शक्तिपूजेला कोणतेही भौगोलिक बंधन नाही. जगातील सर्वच संस्कृतींमध्ये शक्तिपूजा केल्याचे दिसते. तिचे स्वरूप वेगवेगळे असू शकेल. त्यांची नावे वेगवेगळी असतील, परंतु शक्ती, सामर्थ्य यांचे पूजन सर्वत्र लोकप्रिय आहे. स्त्राrदेवतांची पूजासुद्धा मानववंश सातत्य आणि वंशवृद्धी तसेच सामर्थ्यवृद्धी याकरिता आवर्जून केली जाते. नवरात्रात बसवले जाणारे घट हेसुद्धा नवनिर्मितीचेच प्रतीक आहे. शक्तिदेवतेचे अस्तित्व ऐतिहासिक काळातही बघायला मिळते. ग्रीक राजांच्या नाण्यांवर या देवता ओर्दोक्शो, ननाच्या रूपात दिसतात. आपल्या लक्ष्मीशी खूपच साधर्म्य असलेल्या या देवीमुळे शक्तीपूजेचे व्यापक स्वरूप आपल्याला समजते. हिंदुस्थानमध्ये तर शक्तीची पूजा ही लक्ष्मी, दुर्गा, गौरी, काली, महिषासुरमर्दिनी अशा विविध रूपांत केली जाते. देवीचे स्वरूप सौम्य असो व रौद्र ती आपल्या विविध रूपाने मानवाला शक्ती प्रदान करत आलेली आहे.

विविध रूढी, परंपरा, नवस-सायास हे या देवतेशी जोडले गेले आहेत. शक्तीचे रूप असलेल्या देवीच्या अनेक रूपांची मोहिनी शिल्पकारांना पडणे साहजिकच होते. या थोर कलाकारांना तत्कालीन राजसत्तांचे मोठे पाठबळ मिळाल्यामुळे त्यांनी देवीच्या विविध रूपांची शिल्पे घडवली. मूर्तिरूपाने देवीची पूजा होत असली तरी देवीची तांदळा या स्वरूपात उपासनाही आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात रूढ झालेली दिसते. अंबाजोगाई इथली योगेश्वरी हे या उपासनेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. तसेच प्रजनन आणि सुफलन याचे प्रतीक असलेली लज्जागौरीची मूर्ती ही तर अत्यंत आगळीवेगळी अशी मूर्ती आहे. स्त्रीशक्तीची आणि स्त्रीत्वाची पूजा आणि उपासना वेगवेगळ्या पद्धतीने केलेली बघायला मिळते. गुवाहाटी इथली कामाख्या देवी ही अशाच वेगळ्या स्वरूपाच्या पूजनाचे प्रतीक मानली जाते. त्याचप्रमाणे बदामी आणि आलमपूर येथे असलेली लज्जागौरीची उपासनादेखील याच पूजेचे स्वरूप आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती जेथून झाली त्याची देवीरूपाने पूजा करण्याची थोर परंपरा  प्रकर्षाने दिसते. दक्षिण कोकणात सातेरी या नावाने पुजली जाणारी देवी म्हणजे प्रत्यक्षात एक वारुळ असते. वारुळ हेसुद्धा स्त्रीतत्त्वाचे प्रतीक समजले गेले आहे. नाग हा पुरुषतत्त्वाचा प्राणी आणि त्याचा अर्थातच वारुळाशी असलेला संबंध यातून सातेरी देवीची उपासना रूढ झाल्याचे अभ्यासक सांगतात. त्यामुळे कोकणात त्या वारुळाचीच पूजा सातेरी देवी म्हणून केली जाते.  अशी अनेक चित्रविचित्र वैशिष्टय़े आपल्या देशात बघायला मिळतात. गावोगावी नुसत्या पाषाणरूपात असलेल्या सटवाई, भैराई, पावणाई अशा देवींपासून ते अगदी सुबक शिल्पकाम केलेल्या मंदिरात स्थित असलेल्या देवींपर्यंत विविध देवीमूर्तींची आपल्याकडे रेलचेल आहे. या चराचरात अस्तित्वात असलेली देवी आपल्यासमोर मूर्तिरूपात येऊन उभी राहते. या प्रतिमा त्यांच्या खास वैशिष्टय़ांमुळे आपले लक्ष वेधून घेतात.

हरगौरी
पार्वती ही कधी उमा असते तर कधी ती गौरी असते. हा तिच्या रूपांतील फरक मूर्तींमध्ये बघायला मिळतो. मूर्तिकारांनी अतिशय कौशल्याने आणि नेमकेपणाने हा फरक दाखवलेला आहे. जेव्हा पार्वती ही गौरी रूपात दाखवायची असते तेव्हा तिच्या पायाशी तिचे वाहन म्हणून गोधा किंवा घोरपड आवर्जून दाखवली जाते. घोरपड चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोरातील कठोर तप करण्याचे सामर्थ्य हे घोरपडीच्या रूपाने दाखवले जाते. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने अशीच घोर तपश्चर्या केलेली होती. तिचा हा चिवटपणा गोधेच्या रूपात दाखवला जातो. रूपमंडन या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे म्हणजे ‘गोधासना भवेत् गौरी’ या वचनानुसार गौरी ही घोरपडीवर उभी असल्याचे दाखवले जाते. एक सुंदर आणि देखणी हरगौरी लातूर जिह्यातल्या निलंगा गावातील नीलकंठेश्वर मंदिरात पाहायला मिळते. इथे शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. परंतु इथेच एक अजून वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे शिव आणि पार्वती ज्या पीठावर पसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. शंकर व गोधासना पार्वती अशा या निलंग्यातील प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी प्रतिमा असे संबोधले जाते. आपल्याकडे लग्नात गौरीहर पूजला जातो. त्यामागेदेखील घोरपडीच्या चिवटपणाचेच तत्त्व सांगितले आहे. पती-पत्नींनी एकमेकांशी एकनिष्ठ राहावे हे या विधीमधून सुचवायचे असावे. तत्त्वज्ञानाचा मूर्तिकलेवर तसेच समाजजीवनावर पडलेला प्रभाव इथे प्रकर्षाने जाणवतो.

ज्येष्ठा/अलक्ष्मी
विविध रोगांचा नाश करणाऱ्या देवीसुद्धा प्रसिद्ध आहेत. जसे शीतलादेवी, मरीआई, गुडघेमोडी माता. विशिष्ट रोग झाल्यावर विशिष्ट देवतेची उपासना केली म्हणजे तो रोग बरा होतो ही समज अगदी प्राचीन काळापासून बघायला मिळते. नांदेड जिह्यातल्या मुखेड गावातील महादेव मंदिरात ही देवी बघायला मिळते. या मंदिरावर असणारी ज्येष्ठा अथवा अलक्ष्मी म्हणजे दुर्मीळ शिल्प आहे. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले, पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केले अशी कथा पुराणात आढळते. दक्षिण हिंदुस्थानात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. मुखेडच्या महादेव मंदिरावरील ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्भुज असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे तर एका हातात सुरा आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातलेला असून तिच्या डाव्या खांद्यावरून एक मुंडमाळा खाली लोंबते आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव दिसते आहे. अत्यंत दुर्मीळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आहे. अभ्यासक तर तिथे जातीलच, पण खरे तर सर्वांनीच अशा आगळ्यावेगळ्या देवींचे दर्शन अवश्य घ्यायला हवे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या