शिवशाहीच्या इतिहासातील संदर्भगंथ

435

>> शंतनू परांजपे

शिवशाहीच्या इतिहासाचा अभ्यास करताना अनेक भाषांमधील साधने उपयोगी ठरतात. यात मग मराठी, संस्कृत, फारसी, इंग्रजी, फ्रेंच अशा भाषांचा समावेश होतो. त्यातली संस्कृत भाषेतील साधने बऱयाच वेळा समकालीन असल्याने महत्त्वाची ठरतात आणि इतिहास अभ्यासताना त्यांचा जास्त उपयोग केला जातो. या लेखात आपण बघणार आहोत शिवशाहीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यास उपयोगी पडणारी काही संस्कृत साधने. 

1. राधामाधवविलासचंपू –
‘चंपू’ म्हणजे गद्य-पद्यमिश्रित काव्य असणारा साहित्य प्रकार. ‘राधामाधवविलासचंपू’ म्हणजे शहाजी महाराजांचे चरित्रच म्हणावे लागेल. हा प्रशंसापर चरित्रग्रंथ जयराम पिंडये यांनी लिहिला. कर्नाटकात शहाजी महाराजांच्या दरबारात ते संस्कृत पंडित होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे काव्य शहाजीराजांना स्वतः ऐकवले होते. म्हणूनच समकालीन अशा या ग्रंथाचे स्थान इतिहासात अव्वल आहे. या ग्रंथात शहाजीराजांच्या अनेक स्वाऱयांचा समावेश केला गेला आहे. यासोबतच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे, जिजाबाई आणि शिवाजी महाराजांविषयी उल्लेख आढळतात. यावरून नवीन माहितीदेखील उजेडात येते. हा ग्रंथ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी शोधून काढला आणि तो 1922 मध्ये प्रकाशित केला. इतिहासाचार्य राजवाडे यांना हा ग्रंथ कसा सापडला याचे वर्णन करताना ते लिहितात, ‘प्रस्तूत ग्रंथ चिंचवड येथे विष्णुपंत रबडे यांच्या घरी तिसऱया मजल्यावरील पोथ्यांच्या व कागदपत्रांच्या अस्ताव्यस्त गठळ्यात कुजत पडलेला आढळला. सहा महिन्यांपूर्वी रबड यांच्या घरी गेलो असता शेकडो संस्कृत व मराठी पोथ्या तिसऱया मजल्यावरील कौलारू छपराखाली भिजून भाकरीप्रमाणे घट्ट झालेल्या पाहून त्यातून पाचपन्नास लहानमोठे ग्रंथ निवडून व झाडूनपुसून एकीकडे काढले, त्यात ही ‘राधामाधवविलासचंपू’ची पोथी होती.

पोथीच्या त्यावेळच्या स्थितीचे वर्णन करताना राजवाडे म्हणतात, ‘मूलतः पोथीची एकंदर पाने 56 होती. पैकी सातवे पान गहाळ होऊन सध्या 55 पाने शाबूत आहेत. पहिल्या, दुसऱया व अठ्ठाविसाव्या पानांवर छिद्रे पडून काही अक्षरे फाटून गेली आहेत. बाकी ग्रंथ इथून तिथून सुरक्षिताक्षर आहे. पोथीचा कागद जुना जुनरी असून तिची लांबी 9.5 इंच व रुंदी 4 इंच भरेल. दर पृष्ठावर नऊपासून बारापर्यंत ओळी असून प्रत्येक ओळीत चाळीसपासून पंचेचाळीसपर्यंत अक्षरे आहेत. अक्षर अडीचशे वर्षांचे मराठी वळणाचे बाळबोध आहे. पोथी सबंध एका हाताने, एका शाईने व निदान तीन लहानमोठय़ा टोकांच्या लेखण्यांनी लिहिलेली आहे.

2. शिवभारत –
हा काव्यमय ग्रंथ कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला असून शिवाजीराजांच्या आयुष्याचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन ठरतो. परमानंद हा मूळचा नेवासे या गावचा रहिवासी. या ग्रंथात एकूण 32 अध्याय आहेत. यात परमानंद हा शिवाजी महाराजांना अवतारी पुरुष मानतो. ग्रंथ हा समकालीन असल्याने यातील घटनांवर विश्वास ठेवता येतो. ग्रंथात आलंकारिक भाषा ही अनेक ठिकाणी वापरलेली दिसून येते. या ग्रंथात आलेली शेवटची नोंद म्हणजे सिद्धी जौहरचा मृत्यू. थोडक्यात काय तर सध्या सापडलेला हा ग्रंथ अपूर्णावस्थेत आहे. पुढील ग्रंथ पूर्ण झाला, अपूर्ण राहिला की रचनाकर्त्याचा जीवनकाळ संपला हे पुराव्याअभावी सांगणे अवघड आहे.

3. राज्यव्यवहारकोश –
या ग्रंथाची रचना धुंडीराज लक्ष्मण व्यास याने केली आहे. काही अभ्यासकांच्या मते मात्र हा कोश रघुनाथपंत हणमंते यांनी लिहिला. 300 वर्षांच्या मुसलमान राजवटीमुळे व्यवहारातील भाषेत अनेक फारसी शब्द पूर्वी वापरले जात होते. सतराव्या

शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेच्या रक्षणार्थ ‘महाराष्ट्र राज्याची स्थापना केली’ तेव्हा राज्यकारभारात आणि दैनंदिन व्यवहारात आलेल्या अनेक फारसी, अरबी, तुर्की म्हणजेच या नव्या शब्दांना पर्यायी संस्कृत अथवा प्राकृत शब्द योजण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यातूनच राज्याभिषेकानंतर (1674) ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्यासाठी त्यांनी सांगितले. ‘राज्यव्यवहारकोशा’च्या दहा सर्गात 1380 फारसी- दख्खनी उर्दू शब्द आले असून त्यांचे पर्यायी संस्कृत, प्राकृत शब्द सुचविले आहेत.

एवढा कोश तयार करूनसुद्धा मराठी भाषेतील फारसी शब्दांचे प्रमाण कमी झाले नाही. किंबहुना,  संस्कृत शब्दसुद्धा पुढे टिकले नाहीत. मात्र ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करून तत्कालीन मुसलमान साम्राज्याला छत्रपती शिवाजीराजांनी चांगलाच शह दिला हे मात्र खरे.

4. पर्णालपर्वतग्रहणाख्यान –
या ग्रंथाची रचना कवी जयराम पिंडये यांनी केली आहे. हा ग्रंथ स. म. दिवेकर यांनी शोधून प्रकाशित केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या कारकीर्दीत झालेल्या पन्हाळ्याच्या वेढय़ाचे वर्णन करण्यात आले आहे. यात पाच अध्याय व 350 श्लोक आहेत. नुकतेच या ग्रंथाचे पुनःप्रकाशन करण्यात आले आहे.

5. शिवराज्याभिषेककल्पतरू –
हा काव्यग्रंथ कवी अनिरुद्ध याने लिहिला आहे. यात एकूण 234 श्लोक आहेत. या ग्रंथात निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद यांच्यातील काव्यमय संवाद लिहिला असून शिवाजीराजांच्या दुसऱया राज्याभिषेकाची माहिती मिळते. या ग्रंथाची सध्या एकच प्रत उपलब्ध आहे, ती कोलकाता येथे रॉयल एशियाटिक सोसायटी येथे आपल्याला बघायला मिळते. गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकात दोष घडल्यामुळे पुढे काय काय अनिष्ट गोष्टी घडतील याचा उल्लेखदेखील आपल्याला या ग्रंथात बघायला मिळतो.

6. रामचंद्रपंत अमात्यकृत आज्ञापत्र –
शिवकालीन स्वराज्य कसं होतं, त्यामागच्या प्रेरणा काय होत्या हे जाणून घेण्यासाठी ‘आज्ञापत्र’ हे एक श्रेष्ठ दर्जाचे ऐतिहासिक साधन आहे. ‘आज्ञापत्र’ हे रामचंद्रपंत अमात्य यांनी राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत लिहिले. रामचंद्रपंत अमात्य हे अत्यंत कर्तबगार होते. राजाराम महाराजांच्या काळात त्यांना ‘हुकूमतपन्हा’ असा किताब मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगडय़ांना जे जे बोधप्रद मार्गदर्शन केले, त्याचेच स्वरूप म्हणजे हे ‘आज्ञापत्र’. शिवाजीराजांच्या काळात राज्याविषयीची जी जी धोरणे आखली जायची, त्याचा अंदाज आपल्याला या ‘आज्ञापत्रा’तून येतो.

‘आज्ञापत्रा’चे अमात्यांनी दोन भाग केले आहेत. एक भाग इतिहासाचा तर दुसरा हा राजनीतीबद्दलचा आहे. पहिल्या भागात शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र यांचा इतिहास आहे, तर दुसऱया भागात मराठी राज्याची प्रशासन यंत्रणा, अर्थनीती आणि संरक्षण या बाबींची काय व्यवस्था होती याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे. प्रशासन यंत्रणेबाबत लिहिताना राजा, राजधर्म, राज्यव्यवस्था याबद्दल विवेचन केले आहे. अर्थनीतीमध्ये सावकार, वतनदारी या तत्कालीन व्यवस्थेवर भाष्य केलेले दिसून येते. संरक्षण व्यवस्थेबद्दल लिहिताना स्वराज्यातील दुर्ग आणि आरमार या अतिशय महत्त्वाच्या बाबींचा अतिशय खोलवर विचार केलेला दिसून येतो. शिवकालीन दुर्गव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल तर ‘आज्ञापत्र’ हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. तर अशी ही शिवकालाचा अभ्यास करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली संस्कृत साधने. ही सर्व साधने आज बाजारात पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या