राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जे भाजप नेते माझ्याकडे येऊन मिनतवाऱ्या करत बसले होते तेच मला आता संपवून टाकण्याची भाषा करत आहेत असा संताप व्यक्त करतानाच भाजपचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे पालघरमधून शंभर कोटी रुपयांची वसुली करत आहेत, असा सनसनाटी आरोप बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी डहाणू येथे सभा झाली. त्या सभेत त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर खोचक टीका केली होती. आम्हाला संपवून टाकणे म्हणजे गाजरमुळी आहे काय? बापाचं राज्य आहे? का असा सवाल त्यांनी केला होता. फडणवीसांच्या या आरोपांना आज आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर देताना भाजपचे पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गावरील सन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. या हॉटेलमधील गेल्या पंधरा दिवसांमधील घडामोडी तपासा असे आव्हानच ठाकूर यांनी दिले.
रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीसाठी जिल्ह्यातून शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट ठेवले आहे. त्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून 20 कोटी देण्यास सांगितले जात आहे. रवींद्र चव्हाण यांच्यावर पालघर मतदारसंघातील भाजप उमेदवारांची जबाबदारी आहे. त्यासाठी जिल्ह्यातून शंभर कोटी रुपये वसूल करत आहेत असा खळबळजनक आरोप ठाकूर यांनी केला. या वसुलीबाजीत जिल्ह्याच्या विकासाची कामे रखडल्यामुळे जलजीवन मिशनसारख्या योजनांचा बोजवारा उडाला आहे असेही ते म्हणाले.
बेडकासारखं कोण दिसतं?
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकूर यांची तुलना बेडकाशी केली होती. बेडकाने कितीही उड्या मारल्या तरी त्याचा बैल होत नाही असे फडणवीस म्हणाले होते. तोच धागा पकडून ठाकूर म्हणाले, बेडकासारखं कोण दिसतं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःबद्दल इतकं वाईट बोलू नये असा टोमणा त्यांनी यावेळी मारला.
अमित शहा आले, थापा मारून गेले
या निवडणुकीत भाजपचे लोक अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वसईच्या सभेत वसई-विरारला 400 दशलक्ष लिटर पाणी दिल्याची थाप मारली. हे पाणी कोठे आहे ते दाखवा असे आव्हानही त्यांनी दिले. भाजपचे नेते थापा मारून जनतेची सपशेल फसवणूक करत आहेत असेही ठाकूर यावेळी म्हणाले.