देश विदेश – कमला हॅरिस यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. ट्रम्प यांनी स्टेट ऑफ द युनियनमध्ये जे भाषण केले, त्यात ते खोटे बोलले आहेत, असे कमला हॅरिस म्हणाल्या. अमेरिकेतील अर्थव्यवस्था, मतदानाचा अधिकार आणि इराण मुद्दय़ावर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप हॅरिस यांनी केला. अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे, परंतु तो चुकीचा आहे, असे त्या म्हणाल्या.

राजस्थानमध्ये नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीला हार्टअटॅक

राजस्थानातील नागौरमधील एका खासगी शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दिव्या बापेडिया असे या मुलीचे नाव आहे. ती अवघ्या नऊ वर्षांची होती. शाळेच्या मैदानावर खेळत असताना दिव्या अचानक खाली पडली. तिला तत्काळ रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चार महिन्यांपूर्वी तिच्या मोठय़ा भावाचाही अशाच पद्धतीने म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

जेडी वान्स म्हणतात, इराण दहशतवादाचे केंद्र

मध्य पूर्वेत अमेरिकन युद्धनौका आणि सैनिकांच्या तैनाती केली जात असतानाच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी इराणला कडक संदेश दिला आहे. इराण हे दहशतवादाचे सर्वात मोठे पेंद्र बनले आहे. इराण जो जगातील दहशतवादाचा सर्वात मोठा गड आहे, अणू दहशतवादाने जगाला धमकावू शकणार नाही. वेडय़ा, क्रूर आणि जगातील सर्वात धोकादायक राजवटीला अणुबॉम्ब ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. इराणसोबत चर्चा किती काळ सुरू ठेवायची, याचा अंतिम निर्णय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प घेतील, असेही जेडी वान्स म्हणाले.

75 देशांच्या नौदलांचा मिलन-26’ मध्ये सहभाग

विशाखापट्टणमध्ये पार पडलेल्या बहुराष्ट्रीय नौदलाच्या मिलन-26 मध्ये जगातील एपूण 75 देशांनी सहभाग नोंदवला. स्वदेशी विमान वाहून नेणारे जहाज आयएनएस विक्रांतवर या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 19 ते 25 फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या अभ्यासात 75 देशांतील नौदलांनी आपली पॉवर दाखवली. 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या समुद्री अभ्यासात 40 युद्धनौका आणि 29 विमानांनी सहभाग नोंदवला. यात 18 विदेशी जहाज होते. 90 तास उड्डाण करण्यात आले. या युद्धाभ्यासाला 1995 पासून सुरुवात झाली. त्या वेळी केवळ चार देशांनी सहभाग नोंदवला होता.