
एआयवर आधारित स्मार्ट गॉगल स्मार्ट ग्लासेस, कॅमेरे असलेले चष्मे सार्वजनिक ठिकाणी वापरण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. स्मार्ट गॉगलमुळे संवेदनशील ठिकाणांचे व्हिडीओ रेकार्ंडगही शक्य आहे. त्यामुळे सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन स्मार्ट गॉगलच्या वापराबाबत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. त्यासाठी समिती स्थापन केली असून या समितीचा अहवाल चार महिन्यांत सरकारला सादर होणार आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्मार्ट गॉगलच्या निर्बंधांवर चर्चा झाली होती. काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात स्मार्ट चष्मे घालून काही व्हिजिटर्स आले होते. अधिकाऱयांनी ही बाब मंत्रालयाच्या पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली होती अशीही चर्चा आहे. एआय आधारित गॉगल, चष्मे अशा वस्तूंची तांत्रिक क्षमता, व्हिडीओ/ध्वनीमुद्रण, थेट प्रसारण, फेशिअल रेकग्निशन आणि डेटा संकलनाच्या स्वरूपाचा ही समिती सखोल अभ्यास करेल.
संवेदनशील ठिकाणांना धोका
स्मार्ट चष्मे, गॉगलच्या वापरामुळे मंत्रालय, शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, न्यायालय परिसर, विमानतळे, रेल्वे स्थानके, ऊर्जा प्रकल्प, बंदरे, संरक्षणाशी संबंधित संवेदनशील स्थळे, राष्ट्रीय सुरक्षा, राज्य सुरक्षा आणि नागरिकांच्या गोपनीयतेला निर्माण होणाऱया संभाव्य धोक्यांचेही मूल्यमापन ही समिती करील. त्यानुसार एआय उपकरणांचा वापर कसा करावा आणि कसा करू नये याबाबत सुरक्षा प्रोटोकॉल आणि सर्वसमावेशक प्रमाण कार्यप्रणाली तयार करेल.




























































