
नमिता वारणकर
महाराष्ट्रात बैठय़ा खेळांनाही प्राचीन परंपरा आहे. मनोरंजनाबरोबरच या खेळांना पौराणिक महत्त्वही आहे…
काचापाणी, वाघ-बकरी, अष्टचम्मा, चौपार, सापशिडी, चतुरंग, पचिसी, नवकंकारी, मिकाडू, सारीपाट… ही सारी नावे प्राचीन हिंदुस्थानी पट खेळांची… या खेळांची समृद्ध परंपरा आपल्याला लाभली आहे. जमिनीवर पट आखून हे खेळ खेळले जात असत… महाभारत किंवा मध्ययुगीन काळात सोंगटय़ा, पट, फासे किंवा कवडय़ा यांच्या साहाय्याने असे बैठे खेळले जात असत… चौरस, आयताकृती ठोकळे, शिवाय पिवळय़ा, तांबडय़ा, हिरव्या, काळय़ा अशा विविधरंगी सोंगटय़ांचा यासाठी वापर होत असे… मेंढीच्या घोटय़ाच्या हाडे, हस्तीदंत, लाकूड, दगड, धातू, काचा, मौल्यवान रत्ने यापासून सोंगटय़ा, फासे बनवले जात. चपळता, बौद्धिक विकास याबरोबरच सांघिक भावनाही वाढीस लागायची. एवढंच काय, तर या खेळांना पौराणिक महत्त्वही आहे. शिव-पार्वतीचा सारीपाट, नल-दमयंतीचा सारीपाट, खंडोबा आणि म्हाळसेने खेळलेला सारीपाटाच्या खेळाचे वर्णन आध्यात्मिक ग्रंथात वाचायला मिळते, मात्र कालौघात हे बैठे खेळ आपण विसरत आहोत.
हडप्पाकालीन बऱयाच ठिकाणांहून उत्खननात प्राप्त झालेले घनाकृती फासे हे या खेळांच्या अस्तित्वाचे पहिले पुरावे… पटक्रीडेचा उल्लेख पुरातन साहित्य, मूर्तिकला आणि चित्रकलेतही आढळतो… द्युत खेळण्यासाठी पूर्वी राजे द्युतगृहेही बांधत… बऱयाच पुरातन मंदिरांच्या विशेषतः दक्षिणेतील मंदिरांच्या फरशीवर अशा खेळांचे रेखाटन आढळते. हिंदुस्थानातील बऱयाच राज्यांमध्ये अनेक खेळ वेगवेगळ्या पटावरील खेळांपैकी काही खेळ आजही खेळले जातात. अंगणात, ओसरीवर खडूने पट आखून सोंगटय़ांनी हे खेळणे म्हणजे त्या काळातील लोकांचा विनाखर्चिक विरंगुळा… स्त्रीपुरुष, मुले सर्वजण हे खेळ आवडीने खेळत. आजच्या तांत्रिक युगात मुलांना अशा खेळांची ओळख करून देणे आवश्यक आहे.
पटावरच्या खेळांचे महत्त्व
आळीपाळीने खेळणे, नियम पाळणे, संघवर्तन असे गुण या खेळातून विकसित होतात.
खेळात यश मिळवण्याकरिता अभ्यास, सराव, एकाग्रचित्त, सावधानता, मनाचा समतोल, कोणत्याही परिस्थितीत गडबडून न जाणे अशा सर्वोत्तम गुणांची जोपासना होते.
मनोरंजनाद्वारे गणिती ज्ञानात वाढ होते.
हल्लीच्या बऱयाच मुलांचे अंकगणित कठीण असते. ते अशा प्रकारच्या खेळातून या विषयात सुधारणा होऊ शकते.
आकर्षक खेळपट, त्यावरचे खेळविश्व, सोंगटय़ा यामुळे अशा खेळांकडेही लोक आकृष्ट होतात.
या खेळातूनच भूगोल, समान्यज्ञान, इतिहास यांसारखे भाषिक विषय शिकणेही सोपे जाते.
या खेळातून नैतिकतेचे धडेही शिकता येतात. उदा. सापशिडी या खेळात क्रोध, मत्सर, अभिलाषा हे साप आणि सत्कर्म, सदाचार, परोपकार या शिडय़ा आहेत याची माहिती होते.
मानसिक आणि बौद्धिक ताण सहन करण्याची शक्ती खेळाडूमध्ये निर्माण होते.
प्राचीन खेळ
मोक्षपटम (सापशिडी)…सापशिडी’ या नावाने लहान मुले आजही हा खेळ आवडीने खेळतात. याला ‘ज्ञान चौपर’ असेही म्हणतात. वेगवेगळय़ा देशांमध्ये त्यांच्या संस्कृतीची प्रतीकं सापशिडीमध्ये वापरली गेली आहेत. क्रोध, मत्सर, अभिलाषा हे साप आणि सत्कर्म, सदाचार, परोपकार अशा शिडय़ा यात काढल्या केल्या आहेत. पूर्वीच्या काळी सापशिडीच्या पटाबाहेर देवीदेवता, प्राणी, पानं-फुलं यांची चित्रे काढलेली असायची.
वाघ-बकरी…हा दक्षिण हिंदुस्थानातला आवडीने खेळला जाणारा खेळ. दक्षिण हिंदुस्थानातील काही पुरातन देवालयांच्या फरशीवर आरेखित केलेला आढळतो. तामीळ आणि मल्याळम भाषेत ‘आडु पुलि आट्टम’, तेलगुमध्ये ‘मेक पुलिआट्ट’ तर कानडीमध्ये ‘आडु हुली आट्ट’ म्हणून ओळखला जातो. नेपाळमध्ये ‘बाघ-चाल’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तीन षट्कोनी सोंगटय़ा म्हणजे वाघ. बाघ चाल हा खेळ २० बकऱया आणि ४ वाघ घेऊन खेळतात.
पचिसी…अनेक वर्षांपासून खेळल्या जाणाऱया या खेळाचा उल्लेख महाभारतात आढळतो. कौरवांबरोबर खेळताना युद्धिष्ठराने द्रौपदी, आपली भावंड शिवाय आपलं सर्वस्व गमावलं ते याच खेळात. आजचा ‘लुडो’ किवा ‘परचिसी’ असे या खेळाचे प्रकार आहेत. या खेळाचा पट खेळाडूला आपल्या आवडत्या रंगानुसार रंगवता येतो. याच्या पटावरील प्रत्येक बाजू २४ घरांची असते. चौकडी आखलेली घरे म्हणजे ‘गड’ आणि भुजांच्या मधल्या चौकोनाला ‘चारकोनी’,‘चौपार’ असेही म्हणतात.
काचापाणी…हा महाराष्ट्रातला प्राचीन खेळ आहे. यामध्ये बांगडीच्या तुकडय़ांचा वापर करून एकमेकांवर ठेवल्या जातात. एक एक तुकडा बाजूला करताना दुसऱया बांगडीच्या तुकडीचा धक्का लागला न लावता हा खेळ खेळायचा असतो.
पालांगगुडी…हा चिंचोक्यांचा मदतीने कोड सोडवल्याप्रमाणे खेळला जाणारा खेळ आहे. ज्याच्याकडे जास्त चिंचोके राहतील तो खेळाडू जिंकतो.
अष्टापद…आठ रंगांच्या फासे फेकून खेळल्या जाणाऱया या खेळाचं वर्णन बौद्ध धार्मिक ग्रंथ ‘विनयपिटक’ यामध्ये आढळतो. हा खेळ बौद्ध श्रावकांना निषिद्ध असल्याचा उल्लेख आहे. जैनांच्या ‘सूत्रकांग’मध्ये ‘अष्टापाद’ हा खेळ जैन श्रमणांनी खेळू नये, असा उल्लेख आहे. या खेळाच्या पटावरच आजचे बुद्धिबळ खेळले जाते. बुद्धिबळाच्या सोंगटय़ा वापरूनही हा खेळ खेळता येतो. या खेळासारखाच ‘लिडबो’ नावाचा खेळ चीनमध्ये प्राचीन काळापासून खेळला जाणारा ‘झियांगकी’ हा खेळही असाच आहे. प्रत्येकी ४ खेळाडू हा खेळ खेळू शकतात. तेलगूमध्ये ‘अष्टचम्मा’ तर कन्नडमध्ये ‘चौकबार’, बंगालीत ‘आष्टेकाष्टे’तसेच तामीळमध्ये ‘दायकट्टम’ असे या खेळाला म्हटले जाते.





















































