होम मिनिस्टर

>> शिरीष कणेकर

वो उम्रभर कहेते रहे, तुम्हारे सीनेमे दिलही नही
दिलका दौरा क्या पडा, ये दागभी धुल गया

‘वो’च्या बोलण्याला शायरानं अकारण अवाजवी महत्त्व दिलेलं दिसतंय. ‘दिल्या घरी तू अफाट बोलत रहा’ असा आशीर्वाद मुलीची पाठवणी करताना तिच्या माहेरनं दिलेला असतो. ती या आशीर्वादाला जागताना दिसते. मग ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात ती साळसूद चेहऱयानं सांगते, – ‘लग्न झाल्यापासून माझी झोप कमी झाल्येय.’

‘होणारच. जबाबदारी आल्येय ना.’ आदेशभावजी सहानुभूती दाखवतात. दाखवतील तर काय झालं, त्यांना त्याचे पैसे मिळतात. मलाही कोणी पैसे दिले तर सासूबाई व त्यांचे कन्यारत्न अबोल आहेत असं मी म्हणेन. आणखी पैसे दिले तर सासरच्या दारात पडून माझा उद्धार झाला व माझं सोनं झालं असं मी म्हणेन. त्यांनी मला नोटांच्या राशीत पुरलं तर या कुटुंबानं मला पशुयोनीतून मनुष्ययोनीत आणलं असं म्हणण्याच्या थराला मी जाईन. पैसे नुसते दिसले तरी मी पोपटासारखा बोलायला लागतो. कुठे कार्यक्रमाला गेलो तर मानधन हातात पडेपर्यंत मी आयोजकांना हिडीसफिडीस करतो व पैसे हातात पडले की लाळघोटेपणा करतो. एका ठिकाणी खिसा गरम झाल्यावर मी मुक्रीसारख्या दिसणाऱया आयोजकाला देव आनंद म्हणालो होतो.

लग्न झाल्यावर नववधूची झोप कमी होणारच, कारण तिला जागं राहूनच सासरच्या एकेकाचं नाक जमिनीत रगडायचं असतं. बाय द वे, मी टीव्हीवरचा ‘होम मिनिस्टर’ हा पैठणीपट चुकवत नाही. सासवासुनांचं इतकं सूत, इतकं मेतकूट बाहेर कुठं पाहायला मिळतं? मला तर वाटतं की बाहेर समाजात एकमेकींच्या झिंज्या उपटून कचाकचा भांडणाऱया सासू-सुनांना ‘होम मिनिस्टर’मध्ये आणावं. लगेच त्या एकमेकींच्या गळय़ात गळा घालून गायला लागतील – ‘तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा…’ सासवा-सुनांचे संबंध (टीव्हीवर का होईना) गोडीगुलाबीचे केल्याबद्दल आदेश बांदेकरांचा जाहीर सत्कार करायला हवा. (शक्यतो सोनिया व मनेका गांधी यांच्या हस्ते!)

एका जावयानं सासऱयाला विचारले, – ‘मुलीला माझ्याबरोबर पाठवताना तिला मेंदू नाही, हे तुम्ही मला सांगितलंच नाहीत.’
‘तिचा हात देण्याविषयी मी बोललो होतो’ सासरेबुवा म्हणाले, ‘तिच्या मेंदूविषयी काहीच बोलणं झालं नव्हतं.’
एका नवऱयाचं बायकोशी खडाजंगी भांडण झालं. दुसऱया दिवशी पहाटेच तो सासरी गेला.
‘काय जावईबापू, एवढय़ा सकाळी सकाळी येणं केलंत?’ सासऱयानं विचारलं.
‘तुमच्या मुलीशी माझं भांडण झालं.’ नवरा बोलला, ‘ती मला म्हणाली, मसणात जा, म्हणून आलो.’
एक मोठा लेखक (स्वतःची ओळख कशी करून देतात?) लिहून गेलाय, – ‘बायकोशी आतडय़ाचं नातं नसतं. ती परकी असते. अनेकांच्या बाबतीत ती अखेरपर्यंत परकीच राहते.’ (हे मी स्वतःविषयी म्हणतोय हे वाचक ओळखणार नाहीत ना?)
या परकेपणावर खेळकरपणे नेमकं बोट ठेवताना व. पु. काळे नेहमी त्यांचा हातखंडा विनोद करीत. कोणी घरी आलं की चहा ठेवायला सांगताना स्वयंपाक घराकडे बघत ते म्हणत, – ‘अहो निगुडकर-निगुडकर…’
ऐकणारा चकित होई. त्यानं काही विचारण्याची वाट बघत व. पु. दबा धरून बसत. अपेक्षेनुसार अपेक्षित प्रश्न येईच – ‘हा निगुडकर काय प्रकार आहे?’
व. पु. सरसावून बसत. ‘त्याचं काय आहे’ व. पु. बोलू लागत, ‘निगुडकर तिचं माहेरचं आडनाव. या आडनावानं तिनं माहेरी वीस-बावीस वर्षे काढली असतील. त्यानंतरची तीस-पस्तीस वर्षे तिनं माझ्या सोबत काढलीत, पण आजही तिच्या तोंडी ‘आमच्याकडे’ असा उल्लेख असतो. आमच्याकडे म्हणजे निगुडकरांकडे; काळय़ांकडे नाही. पस्तीस वर्षांनंतरही ती काळे झाली नसेल व निगुडकरच राहिली असेल तर त्याच नावानं तिला बोलावणं संयुक्तिक नाही का?…’

सौ. काळे, सॉरी- निगुडकर आतून हसत हसत चहा घेऊन येत. बहुसंख्य बायका नवऱयाकडे ‘डेप्युटेशन’वर आल्यासारख्या राहतात. मग लग्नाचा इतका आटापिटा कशासाठी? आहात त्या घरी सुखी रहा. ‘लेक लाडकी या घरची, होणार (नाही. त्रिवार नाही) सून ती त्या घरची’… आईला राहायला, लुडबुड करायला, धुडगुस घालायला हक्काचं घर असावं म्हणून तर मुली लग्न करत नसतील ना? त्यानंतर ‘जावई मला मुलासारखा आहे’ असं म्हणायला ‘होम मिनिस्टर’ आहेच. मुलाला बिचाऱयाला ही लादलेली दुसरी आई परवडत नाही. आईच्या अभद्र उपस्थितीमुळे लेकीला नवऱयाला चेचायला अधिक बळ येतं. आई, तू यांना उखळात चेच, मी खलबत्त्यात चेचते. आई म्हणत असेल ‘आता उखळ कुठून आणू? तू आधी खलबत्त्यात चेच; मग मी पाटय़ावर घेऊन वाटणासारखी वाटते. पार चटणी करू त्याची.’

आदेशभावजी कौतुकानं डवरलेल्या चेहऱयानं बघतील व म्हणतील, – ‘अशाच आनंदात रहा. वहिनी, तुम्ही नवऱयाची व ताई, तुम्ही जावयाची पार मेंदी करून टाका. चला, आपण सगळे मिळून गाऊया, – ‘मेहेंदी लगी मेरे हाथ रे’…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या