मध खराब होत नाही, मग मधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का असते ?

नैसर्गिक मध हा कधीच खराब होत नाही असं म्हणतात.  पूर्वी रशियन सोविएत संघाचे राज्य असलेल्या जॉर्जियामध्ये झालेल्या उत्खननात हजारों वर्षांपूर्वीचा जुना मध चिनीमातीच्या बरणीत सापडला होता.  दुसऱ्या एका उत्खननात पिरॅमिडमध्ये  3000 वर्ष जुना मध सापडला होता असं म्हणतात.  हा मध खराब झाला नव्हता असंही सांगितलं जातं. मध शुद्ध असेल तर मग तो खराब होत नाही असं म्हटलं जातं, मग प्रश्न निर्माण होतो की हल्लीच्या मधाच्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट का छापलेली असते ?

पतंजली, डाबर, झंडूसह अनेक कपन्यांकडून फसवणूक, मधात भेसळ

अन्न आणि औषधे प्रशासनाच्या नियमाप्रमाणे बाटलीबंद किंवा पॅकबंद अन्न आणि औषधांच्या वेष्टणावर किंवा बाटलीवर किंमत, वजन, घटक द्रव्ये, उत्पादनाची तारीख तसेच एक्स्पायर होण्याची तारीख याबाबतची माहिती देणे बंधनकारक असते. Quora या प्रश्नोत्तरांच्या मंचावर कॅनरा बँकेचे माजी अधिकारी सुरेश वानखेडे यांनी दिलेल्या उत्तरात म्हटलंय की  याचा अर्थ असा होत नाही की शुद्ध मध हा बाटलीवरील एक्सपायरी डेटनंतर खराब होतो.  कायद्याची पूर्तता करण्यासाठी म्हणून मधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट छापली जाते. वानखेडे त्यांच्या उत्तरात म्हणतात की त्यांच्याकडे असलेल्या मधाच्या बाटलीवर मधाची एक्पायरी डेटच नाहीये. त्यावर  फक्त उत्पादनाची तारीख छापल्याचं त्यांचं म्हणणं आहे.  दुस-या उत्पादकांनी बेस्ट बीफोर असं म्हणत कालावधीचा उल्लेख केल्याचंही ते आपल्या उत्तरात म्हणतात.

वानखेडे यांच्या अनुसार मध दीर्घकाळ टीकून राहण्यासाठी त्यात वेगळी रसायने मिसळण्याची गरज नसते.  मात्र काही जण त्यामध्ये रंग, सुगंध व गोडव्यासाठी साखरही टाकतात. आपला फायदा वाढवण्यासाठी ते हे उलटसुलट धंदे करत असल्याचं वानखेडे यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलं आहे.  मधात जर अशा पद्धतीने भेसळ केली तर मग तो खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे काही जण भेसळयुक्त मधाची एक्स्पायरी डेट छापत असतात.

मध जितका जुना होतो तितका तो गडद काळपट होतो,  मध हा जुना झाल्यावर घट्ट होऊन स्फटिकासारखा होतो.  मात्र तो मध खराब झाला असं म्हणता येत नाही कारण त्याला थोडी उष्णता दिली की तो पुन्हा वितळून पूर्ववत होतो असं वानखेडे यांनी म्हटलं आहे. मध जितका जुना तितका तो गुणकारी असं आयुर्वेदात म्हटलं आहे. त्यामुळे जुन्या मधाला चांगली किंमत मिळते.  मधामध्ये भेसळ केली असल्यास तो खराब होण्याची शक्यता असते. ही भेसळ झाली आहे की नाही हे ओळखण्याचं सोपं तंत्रही वानखेडे यांनी त्यांच्या उत्तरात दिलं आहे.  मधाची शुद्धता तपासण्यासाठी मधाचे काही थेंब पाण्यात टाकून पाहावेत. खरा मध पाण्यात न मिसळता तळाला बसतो तर नकली खोटा मध पाण्यात विरघळत मिसळतो असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या