बेडची माहिती अपडेट नसल्यास रुग्णालयांना नोटीस, पालिका आयुक्तांनी दिले निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या काळात विविध रुग्णालयांमधील बेडची अद्ययावत माहिती मुंबई महानगरपालिकेच्या संगणकीय डॅशबोर्डला दिली नाही तर अशा रुग्णालयांना नोटीस पाठवाव्यात, असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. चहल यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अधिकाऱयांची विशेष ऑनलाइन बैठक झाली. यात हे निर्देश देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी महापालिकेने संगणकीय डॅशबोर्ड सुरू केला आहे. या डॅशबोर्डवर संबंधित रुग्णालयांनी बेडबद्दलची माहिती नियमितपणे ‘अपडेट’ करणे गरजेचे आहे.

22 नर्सिंग होम, रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस
महापालिकेने 22 नर्सिंग होम, रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये निरलॉन रुग्णालय, बोरिवलीचे अपेक्स रुग्णालय, बालाजी, लाईफ लाईन या रुग्णालयाचा समावेश आहे. सर्व रुग्णालयांमधील खाटांचे नियोजन पालिकेच्या विभाग स्तरावरील वॉररूममार्फतच केले जात आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिलेल्या कोणत्याही रुग्णालयाला थेट रुग्ण दाखल करून घेता येणार नाही, असे पालिकेने आधीच स्पष्ट केले आहे.