
पुणे आणि मुंबईसारख्या शहरात घरांचे भाव गगनाला भिडले आहेत, मात्र आता घरभाडेही खिशाला परवडण्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे. घरभाडे भरताना आता तुमचा महिन्याचा पगारच संपून जाईल अशी स्थिती आहे. कारण, बडय़ा शहरांमध्ये भाडय़ात वाढ झाली असून बंगळुरूत भाडय़ाने राहायचे असेल तर 30 टक्के अधिक भाडे द्यावे लागेल तर मुंबईत 17 टक्के आणि पुण्यात 24 टक्के भाडेवाढ झाली आहे.
2025 च्या पहिल्या तिमाहीत हिंदुस्थानातील प्रमुख शहरांमधील घरांच्या भाडय़ात मोठी वाढ झाली आहे. 1 बीएचके आणि 2 बीएचके घरांना सर्वाधिक मागणी आहे. गृहकर्जाच्या वाढत्या दरांमुळे अनेकजण भाडय़ाच्या घरांना प्राधान्य देतात, मात्र आता घरांचे भाडे तब्बल 30 टक्क्यांनी वाढले आहे. मुंबईत सध्या पश्चिम उपनगरात मोठय़ा प्रमाणावर पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित झाले असून घरांच्या किमतीमध्ये आधीच भरमसाठ वाढ झाली आहे. त्यातच आता घरभाडय़ातही मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, मार्पेटची गरज ओळखून वर्षाकाठी 8 ते 10 टक्के भाडेवाढ करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे घरमालकांसमोरही भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असले तरीही हे भाडेही देण्यास अनेकजण तयार होत असल्याचे चित्र आहे. शहरांमध्ये भाडय़ाचे घर घेण्याकडे लोकांच कल आहे.
बंगळुरू 30 टक्के 6 हजार ते 10 हजार
हैदराबाद 27 टक्के 5 हजार ते 9 हजार
पुणे 24 टक्के 4,500 ते 8 हजार
मुंबई 17 टक्के 7 ते 12 हजार
नोएडा 16 टक्के 4 ते 7 हजार
गुरुग्राम 15 टक्के 5 ते 9 हजार
पश्चिम उपनगरात 50 हजार ते सवा लाख भाडे
पश्चिम उपनगरात मोठय़ा प्रमाणावर इमारतींचा पुनर्विकास होत असून येथील घरांचे भाडे तब्बल 50 हजार ते सवा लाख रुपयांच्या घरात गेले आहेत. घरांना मागणी अधिक आणि पुरवठा मर्यादित असे चित्र असल्यामुळे घरभाडय़ात अवाच्या सवा वाढ झाल्याचे रियल्टी क्षेत्रातील तज्ञांनी म्हटले आहे. मुलांच्या शाळा तसेच मुंबईच्या ठिकाणी कार्यालये यांमुळे मुंबईतच घरे घेण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.