
>> समाधान दिसले
विद्यार्थी व पालकांचा ओढा इंग्रजी शाळेकडे वाढत चालल्याने मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. मात्र मायमराठी वाचवण्यासाठी चौकमधील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा एकमुखी ठरावच चौकमधील नावंढे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला आहे. या ठरावाचे रायगड जिल्ह्यातील मराठीप्रेमींनी स्वागत केले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नावंढे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण चार शाळा आहेत. नावंढे शाळा पहिली ते पाचवीपर्यंत असून नावंढेवाडीमधील शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. कांढरोली येथील शाळा पहिली ते सातवी तर घोडीवलीवाडी येथील शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. इंग्रजीच्या आकर्षणामुळे गेल्या काही वर्षांपासून या शाळांची पटसंख्या कमी झाली. त्यामुळे मराठी शाळांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जास्तीत जास्त विद्यार्थी मराठी शाळांकडे आकर्षित व्हावे यासाठी नावंढे ग्रामपंचायतीने नामी युक्ती शोधून काढली.
पाच झाडे लावल्यास पैठणीची भेट
ग्रामस्थांनी मंजूर केलेल्या ठरावाचा लाभ नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील नावंढे, नावंडेवाडी, कांढरोली, घोडीवलीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या चार शाळांना होणार आहे. दरम्यान मराठी शाळा वाचवण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठीदेखील ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ज्या महिला पाच झाडे लावून त्याचे संगोपन करतील अशांना पैठणी देऊन सन्मानित केले जाणार आहे. पुरुषांनी झाडे लावली तर त्यांचाही आकर्षक ड्रेस देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी किरण हाडप यांनी दिली.
शुक्रवारी ग्रामस्थ प्रकाश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची सभा पार पडली. त्यात पर्यावरणप्रेमी किरण हाडप यांनी मराठी शाळेत प्रवेश घेतला तर घरपट्टी माफ करावी, अशी सूचना केली. ही सूचना सर्वांनुमते मंजूर करण्यात आली. मराठी शाळेत प्रवेश घेतला तर घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेणारी नावंढे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली पंचायत ठरली आहे. या ग्रामसभेला शेखर हाडप, पप्पू हाडप, ज्योती पिंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.