
सामना प्रतिनिधी । मुंबई
हॉस्पिटलला गेलेल्या केळुस्कर यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना दादर येथे घडली. घरात घुसण्याआधी चोरांनी इमारतीमधील अन्य घरांच्या दरवाजाच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या.
दादरच्या भवानी शंकर रोडवरील तपस्या इमारतीत रमेश केळुस्कर (65) हे राहतात. सेवा निवृत्त असलेले केळुस्कर सोमवारी सायंकाळी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कुडे यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. जाताना त्यांनी दरवाजाला कुलूप लावले होते. सकाळी सहाच्या सुमारास ते घरी परतले तेव्हा कुलूप तोडलेला व घरातल्या कपाटातील साडेबारा तोळ्याचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे केळुस्कर यांनी आजूबाजुला विचारपुस केली असता, आमच्या घराच्या दरवाजांना रात्री बाहेरून कड्या लावल्या होत्या असे शेजारच्यांनी सांगितले. याप्रकरणी केळुस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दादर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.























































