
‘लग्नाआधी मुलगा आणि मुलगी हे अनोळखी असतात. अशा स्थितीत ते शारीरिक संबंध कसे ठेवू शकतात,’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केला. ‘आमचे विचार जुनाट वाटू शकतात, पण लग्नाआधी मुला-मुलींनी सावध राहायला हवं. नातं कितीही घट्ट असो, कोणावरही विश्वास ठेवू नये,’ असा सल्लाही न्यायालयाने दिला. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीच्या जामीन अर्जावर आज न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने काही निरीक्षणे नोंदवली.
काय आहे प्रकरण…
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, 2022 मध्ये तिची आरोपीशी एका मॅट्रिमोनियल साइटवर ओळख झाली. त्यानंतर दोघे संपर्कात आले. आरोपीने तिला लग्नाचे वचन दिले. दिल्ली आणि दुबई येथे तिच्याशी अनेकदा संबंध ठेवले. तिच्या परवानगीशिवाय शरीर संबंधांचे व्हिडीओ बनवले. तसेच कुठे वाच्यता केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
हे प्रकरण खटला चालवण्यायोग्य नाही!
‘तक्रारदार महिला लग्न करण्यावर ठाम होती. लग्न होणार हे तिला माहीत होते तर लग्नाआधी तिने आरोपीसोबत दुबईला जायलाच नको होते. इथे सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचे दिसते. अशी प्रकरणे खटला चालवण्यासाठी आणि दोष सिद्धीसाठी योग्य नाहीत. वादी-प्रतिवादींनी यात तडजोडीने मार्ग काढायला हवा,’ असे मत खंडपीठाने व्यक्त केले. हे प्रकरण मध्यस्थाकडे सोपवण्याचे संकेत देत सुनावणीला स्थगिती दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.
































































