
दिल्लीतील दहशतवादी स्फोट प्रकरणात काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीपासून २० किमी अंतरावर २,९०० किलो स्फोटके कशी पोहोचली? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना पवन खेरा म्हणाले आहेत की, “पुलवामा हल्ल्यात आरडीएक्स कसे पोहोचले याबद्दल आम्ही प्रश्न विचारत राहिलो, परंतु आम्हाला अद्याप त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. आता राजधानी दिल्लीपासून २० किलोमीटर अंतरावर २,९०० किलो स्फोटके पोहोचली आहेत. प्रश्न तोच आहे की, ते तिथे कसे पोहोचले? लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात लोक मारले जातात आणि जखमी होतात. याची जबाबदारी कोण घेत आहे? हे संपूर्ण देशाचे प्रश्न आहेत आणि आम्ही सांगत आहोत की, सरकारने कठोर पावले उचलावीत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.”
पवन खेरा म्हणाले की, “पहलगामनंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारने सांगितले होते की ,कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचा गुन्हा मानला जाईल. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, सरकार या हल्ल्याकडे कसे पाहते, कारण तो बाह्य शक्तींकडून समर्थित आणि प्रेरित असल्याचे दिसून येते.”


























































