भाजपवाल्यांना आधीच कसे कळते की, न्यायालयात काय निकाल लागणार?’ सौरभ भारद्वाज यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. अबकारी धोरण (Liquor Policy) प्रकरणात न्यायालयाचा काय निकाल लागणार, हे भाजप नेत्यांना आधीच कसे समजते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सौरभ भारद्वाज यांनी भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि नेते कपिल मिश्रा यांच्या विधानांवरून निशाणा साधला. कपिल मिश्रा यांनी सोशल मीडियावर “पिक्चर अभी बाकी है” अशी पोस्ट केली आहे. यावर बोलताना भारद्वाज म्हणाले, “उच्च न्यायालयात अद्याप सुनावणी बाकी असताना, कोणत्या पिक्चरबद्दल बोलले जात आहे? भाजप नेत्यांना निकालाची पूर्वकल्पना कशी काय असू शकते?”

वीरेंद्र सचदेवा यांचा एक व्हिडीओ दाखवत भारद्वाज यांनी विचारले की, “सचदेवा उघडपणे सांगत आहेत की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि दुर्गेश पाठक हे दोषी आहेत आणि त्यांना नक्कीच शिक्षा होईल. अद्याप खटला सुरू असताना त्यांना हे निश्चित कसे ठाऊक आहे? ते थेटपणे असे सुचवत आहेत का की, या खटल्यात पुढे काय होणार आहे. याची त्यांना पूर्ण माहिती आहे?”

सौरभ भारद्वाज यांनी यावेळी २०२० च्या दिल्ली दंगलींचा आणि तत्कालीन न्यायाधीश मुरलीधर यांच्या निकालाचा संदर्भ दिला. “ज्या कपिल मिश्रांनी दंगलीच्या वेळी चिथावणीखोर विधाने केली होती, त्यांच्यावर न्यायालयाने ओढलेले ताशेरे सर्वांनी पाहिले आहेत. अशा परिस्थितीत, सत्ताधारी पक्षाचे नेते न्यायप्रक्रियेच्या निकालाबाबत आधीच भाष्य करत असतील, तर ते गंभीर आहे,” असेही भारद्वाज म्हणाले.