विद्यार्थ्यांविना संस्था कशी चालवायची? खासगी आयटीआयना हवीय प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

राज्यातील, विशेषतः मुंबई आणि उपनगरातील खासगी आयटीआय संस्थांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबई विभागातील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना कॉलेजशी संपर्क साधणे शक्य नाही. तसेच शहरात राहणारे बरेच विद्यार्थी कोरोनामुळे कुटुंबासह मूळ गावी परतल्याने ते पुढील शिक्षण घेऊ शकत नसल्यामुळे खासगी आयटीआयमधील 60 ते 70 टक्के जागा प्रवेश प्रक्रिया संपली तरी रिक्त आहेत.

यंदा कोरोनाचा फटका आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उशिराने सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र प्रत्यक्षात प्रवेश घेण्याला नापसंती दर्शवली आहे. यंदा राज्यामध्ये आयटीआयला फक्त 57.70 टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. यातही विशेष म्हणजे शासकीय आयटीआय संस्थांमध्ये 77.69 टक्के तर खासगी आयटीआय संस्थांमध्ये अवघे 39.27 टक्के प्रवेश झाले आहेत. त्यामुळे असोसिएशन ऑफ नॉनगव्हर्मेंट आयटीआय, महाराष्ट्राने प्रवेश प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत वाढवून देण्याची डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंगकडे (डीजीटी) मागणी केली आहे.

खासगी संस्था फीवर अवलंबून

आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्यक्ष प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. 31 डिसेंबरला प्रवेशाची मुदत संपल्यानंतर ती 16 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली, पण या मुदतीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केंद्राकडे केल्याचे असोसिएशनचे देवेंद्र पाटणे यांनी सांगितले. आयटीआयच्या खासगी संस्था या स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालत असल्याने फीमधून मिळणाऱ्या पैशांतूनच शिक्षकांचे पगार भौतिक सोयीसुविधांचा खर्च भागवला जात असल्याने प्रवेश कमी झाल्यास संस्था आर्थिक चणचणीत सापडण्याची भीतीही पाटणे यांनी व्यक्त केली.

राज्यभरात सरकारी आयटीआयमध्ये 93,220 तर खासगी आयटीआयमध्ये 55,036 अशा एकूण 1 लाख 48 हजार 256 जागा आहे. यंदा यातील सुमारे 53,886 जागांवरच प्रवेश झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या