
सामना ऑनलाईन। शिमला
जर इच्छाशक्ती दांडगी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तुम्ही स्वत:ची नवीन ओळख निर्माण करू शकता, असं बोललं जात. या वाक्याशी साम्य असलेलं उदाहरण हिमाचल प्रदेशमध्ये बघायला मिळालं आहे. बलात्काराच्या आरोपाखाली शिमला मॉडल मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या एका तरुणाने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मासिक लिहलं आहे. एवढेच नाही तर तो आयएएस बनण्याची तयारीही करत आहे. विक्रम सिंह खिमता (२७) असे त्याचे नाव आहे. बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्याने विक्रमला न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये बलात्कारप्रकरणी येथील न्यायालयाने भादंवि कलम ३७६ अंतर्गत विक्रमला दोषी ठरवत ७ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तेव्हापासून विक्रम शिमला येथील मॉडेल मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पण विक्रमने मात्र तो निर्दोष असल्याचा दावा केला असून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण या दरम्यानचा वेळ तुरुंगात खितपत वाया न घालवता सत्कार्य करण्यात घालवण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यातच हिमाचल प्रदेशमध्ये कैद्यांचे पुनर्वसन केले जात आहे. याचाच फायदा घेत एम ए झालेल्या विक्रमने इतर कैद्यांमध्ये सकारात्मक विचार रुजवण्यास सुरुवात केली. यासाठी तो नियमित वाचन करतोय. त्यातील टीप्पण वहीत नोंदवतोय. त्यातूनच त्याने आता ‘आयएएसची’ तयारी सुरू केली असून यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मागर्दशन करणारं मासिकही लिहिलं आहे. ‘काँम्पिटीशन कंपेनियन’ नावाच्या या मासिकाला विद्यार्थ्यांनीही भरघोस प्रतिसाद दिला आहे.
तुरुंगात शिक्षा भोगत असताना कैद्यांनी पुस्तक लिहण्याची किंवा परीक्षा पास होण्याची ही काही पहीली वेळ नाही. याआधी २०१५ साली वाराणसी मध्यवर्थी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतून (IGNOU) पर्यटन अभ्यासक्रमात देशभरातून प्रथम येण्याचा मान पटकवला होता.























































