गणेशोत्सवाआधी खरेदीचा उत्सव! मुंबई आणि ठाण्यामध्ये वीकेंडला बाजारात तोबा गर्दी

मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरात बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. येत्या आठवडय़ात शनिवार, 7 सप्टेंबर रोजी गणपतीबाप्पाचे धूमधडाक्यात आगमन होणार आहे. त्यामुळे काल शनिवार आणि आज रविवारी दादर, लालबाग, परळ मार्केट, ठाणे, नवी मुंबई येथील बाजारपेठा अक्षरशः गर्दीने फुलून गेल्या. पूजेच्या साहित्यापासून ते प्रसादापर्यंत आणि मखर तसेच आरास करण्यासाठी लागणाऱया फुलांच्या माळा, लायटिंग इत्यादी खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी आज बाजारपेठांमध्ये दिसली.

आजचा रविवार हा खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने मुंबई तसेच उपनगरातील नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र होते. बाजारपेठाही विविध रंगी, विविध प्रकारच्या वस्तूंनी फुलून गेल्या आहेत. फुलांच्या तसेच विजेच्या माळा, सजावट साहित्यांनी सजलेले स्टॉल्स सर्वत्र दिसत आहेत. मखराचे साहित्य, रंगीबेरंगी विविध प्रकारच्या विद्युत माळा, विद्युत समई, पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी तबक, आकर्षक हार, विविध आकारांची विविधरंगी फुले, अगरबत्ती. धूप, रांगोळीचे छाप, ज्योतीच्या वाती, रांगोळीचे विविध रंग, अस्तर, उपरणे, चांदीचे मोदक, दूर्वा, कमरपट्टा, मूषक, चंदनहार अशा प्रकारच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून खरेदीसाठी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी आज बाजारपेठांमध्ये दिसली.

प्लॅस्टिक फुलांच्या माळा, मोरपंख, विद्युत माळा, बाप्पासाठी रुद्राक्ष, सोनेरी मण्यांचे हार, लाल-पिवळय़ा गोंडय़ांचे हार, मोत्यांचे हार, सॅटन रिबनपासून बनलेले हार तसेच विविध खडय़ांच्या सोंडपट्टय़ा, कानांच्या पाळय़ांमध्ये घालायचे दागिने अशा वस्तू गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहेत.

ठाणे मार्केट गर्दीने हाऊसफुल्ल

गणेशोत्सवाआधीचा शेवटचा रविवार असल्याने सुट्टीचा मुहूर्त साधून असंख्य ठाणेकर खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. जांभळी नाका, जुना स्टेशन रोड, खारकर आळीचे मार्पेट, नौपाडा, राममारुती रोड हजारो ठाणेकरांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. मखर, माळा, रंगीत कागद, विद्युत रोषणाई, कागदी फुले आदी सजावटींचे साहित्य खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. त्याचबरोबर कपडय़ांची दुकानेही गर्दीने ओसंडून वाहत होती. त्यामुळे या परिसरात सायंकाळी ट्रफिक जाम झाले होते.