
शनिवारची रात्री इराणसाठी विनाशकारी ठरणार असा इशारा अमेरिकेने दिला होता. हा इशारा खरा ठरला असून अमेरिका आणि इस्रायलने रात्रभर इराणची राजधानी तेहरानवर हल्ले केले. तेहरानमधील तेल डेपोंना अमेरिका आणि इस्रायलने टार्गेट केल्याचे समोर आले असून इस्रायलच्या संरक्षण दलानेही यास दुजोरा दिला आहे. आम्ही तेहरानमधील तेल डेपोंवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले. तेहरानमधील शाहरान तेल डेपोला भीषण आग लागली आहे. या आगीचे भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलाने याबाबत माहिती दिली.
इस्रायल-अमेरिकेने इराणच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा तेलाच्या व्यापारावर असून यालाच आता निशाणा बनवले जात आहे. इस्रायल संरक्षण दलाने तेहरानमधील हल्ला इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांचे नुकसान करण्याच्या दिशेने उचललेले एक पुढचे पाऊल असल्याचे म्हटले. तसेच इराणची दहशतवादी राजवटीचे सैन्य दल याच इंधनाच्या वापर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी करते आणि विविध संस्थांना यातूनच तेल पुरवते, त्यामुळे त्यास लक्ष्य केल्याचेही इस्रायलने स्पष्ट केले.
आगीचे लोळ उठले, धुरामुळे आकाशही दिसेनासे झाले; तेहरानमधील तेल डेपोंवर इस्रायल-अमेरिकेचा मिसाईल हल्ला #IranWar #IranIsraelWar #TehranStrikes pic.twitter.com/EXwTt8fNS2
— Saamana Online (@SaamanaOnline) March 8, 2026
इराणच्या सरकारी माध्यमांनीही तेहरानमधील एका तेल डेपोवर हल्ला झाल्याची माहिती दिली. राजधानी तेहरानमधील मुख्य रिफानरीजवळील तेल डेपोवर हल्ला झाला आहे, असे इराणच्य सरकारी माध्यमांनी म्हटले. मात्र यात रिफायनरीचे नुकसान झाले नसल्याचे आयएलएनएने स्पष्ट केले. तसेच तेहरानमधील वायव्य भागात असलेल्या तेल डेपोवरही हल्ले झाले असून तिथून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठत असल्याचे एका पत्रकाराने सांगितले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
ट्रम्प यांचे तिरकस विधान
दरम्यान, इराणमधील मिनाब काउंटीतील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात अनेक लहान मुलींचा मृत्यू झाला. या हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणलाच जबाबदार धरले. आम्हाला वाटते हा हल्ला इराणनेच केला आहे. इराणची दारुगोळा डागण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्याकडे अचूकता नाही, असे म्हणत ट्रम्प यांनी शाळेवरील हल्ल्याला इराणलाच जबाबदार धरले. ते ‘एअर फोर्स वन’ विमानात पत्रकारांशी बोलत होते.




















































