चला… हुरडा खायला!

723

>> पराग पोतदार

‘गावाकडे चला…’ याचा सोयीस्कर मर्यादित अर्थ घेऊन सुट्टय़ांमध्ये गावाकडे फिरायला जाऊन आनंद लुटणाऱयांची संख्या आता सातत्याने वाढू लागली आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून शेतीतल्या पिकांना आणि बळीराजाला नसले तरी कृषी पर्यटनाला मात्र काही प्रमाणात ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसते आहे. त्यातूनच थंडीचा मौसम सुरू झाल्यानंतर खास हुरडय़ाची गावरान चव आणि चुलीवरच्या जेवणाची लज्जत अनुभवण्यासाठी शहरी पावले तिकडे मोठय़ा संख्येने वळताना दिसत आहेत.

आजचा जमाना आहे ‘सेलिब्रेशन’चा! त्यामुळे आता ही थंडीसुद्धा आनंदाने ‘सेलिब्रेट’ करण्याचा एक नवा ट्रेंड आलेला आहे. त्यामुळे या थंडीच्या दिवसांत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी ठिकठिकाणी जाणारे उत्साही लोक असतात त्याचप्रमाणे अस्सल ग्रामीण जीवनाचा आनंद अनुभवण्यासाठी आणि त्यातून खाण्याची लज्जत वाढवण्यासाठी उत्साही पर्यटक ग्रामसंस्कृतीच्या दिशेने येऊ लागले आहेत.

दमछाक करणारे जगणे, सततची ओढाताण, कामातील नकोसे झालेले ताणतणाव या सर्वांतून थोडेसे मुक्त व्हावे, मनाला थोडी शांतता मिळावी मस्त गप्पांचा फड जमवावा आणि आनंद घेत दिवस घालवावा असे वाटणारा चाकरमानी, व्यावसायिक कामातून उसंत काढून गावाकडे धाव घेतो. ग्रामीण संस्कृतीच्या जवळ जाण्याचा, तिथल्या वातावरणात रमण्याचा आणि तिथले जीवन जवळून काही काळ का होईना अनुभवण्याचा आनंद त्याला लुटायचा असतो.

महाराष्ट्रामध्ये ग्रामीण ढंगातील विशेषत्वाने असे तीन प्रकार आहेत जे सध्या विशेष लोकप्रिय होत चालले आहेत. एक म्हणजे हुरडा पार्टी, दुसरे म्हणजे भरीत पार्टी आणि तिसरे म्हणजे पोपटी.
ही म्हणजे अस्सल मराठमोळी मेजवानी बरं का!
पण थंडी म्हटली की गेल्या काही वर्षांपासून ‘हुरडा पार्टी’चे वेध लागलेले दिसतात. ज्वारीची कोवळी कणसं जरा जोमात आली की या हुरडा पाटर्य़ांचे पेव फुटलेले दिसते.
शेतात राखणीला राहताना किंवा उगी गप्पांचे फड जमवताना तोंडाला चाळा म्हणून तिथल्याच उपलब्ध साधनसाम्रगीत काही तरी झटपट करायचे. यातूनच ताज्या रसाने भरलेला दुधाळ कोवळा हुरडा भाजून खाल्ला जायचा. हळूहळू गावापुरता असलेला हुरडा शहरी लोकांना कधी भुरळ घालायला लागला हे कुणालाच कळलं नाही. ‘हुरडा पार्टी’ ची सुरुवात झाली खरं तर अगदी कौटुंबिक स्तरावर. पण हळूहळू त्याला आता संपूर्ण व्यावसायिक स्वरूप आलेले आहे.

दिवसभराचे सेलिब्रेशन!
तीन चार कुटुंबे एकत्र मिळून, मित्रांचे ग्रुप, व्यावसायिक गट असे एकत्रितपणे हुरडा पाटर्य़ांसाठी ठिकठिकाणी जागांचा शोध घेतात. हुरडा पार्टी हे निमित्त पण त्याच्या जोडीने दिवसभराचे सेलिब्रेशन करावे असा प्रयत्न असतो. मग या गरज लक्षात घेऊन हुरडा पार्टीचे आयोजन करणाऱयांनीसुद्धा शिवारफेरी, बैलगाडीतून चक्कर, चिकू-आंब्याच्या वाडीला भेट, रानमेव्याची लज्जत, लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा असे सारे काही देऊन आकर्षित करू पाहतात. सकाळी आल्यानंतर संध्याकाळी निवांतपणाने दिवस घालवता यावा असा प्रयत्न त्यामागे असतो. सकाळी आल्याबरोबर पारंपरिक स्वागत केले जाते उसाच्या ताज्या रसाने ! मग गप्पा मारायला बसल्यावर येतात गरम गरम कांदा भजी!… थोडया वेळाने आपल्यासमोर ज्वारीचे कोवळे दाणे सोलून, भाजून हुरडा तयार होतो आणि खरपूस भाजून मीठ, मसाला आणि चटणीसोबत दिला जातो. दुपारी गरमागरम जेवण तेपण छान चुलीवरचे! या आनंदासाठी लोकांची हवे तितके पैसे मोजायचीही तयारी दिसते.

कॉर्पोरेट ‘रिलॅक्सेशन’
नियमितपणे दरवर्षी हुरडा पार्टी साजरा करणारी कुटुंबे तर आहेतच पण आता कॉर्पोरेटमध्येसुद्धा याचे लोण येत असून दरवर्षी एक ‘रिलॅक्सेशन’चा भाग म्हणून हुरडा पार्टीसाठी सर्वांना नेले जाते. या सर्वांमुळे आता ‘हुरडा पार्टी’चे आयोजन व्यावसायिक स्तरावर होऊ लागले असून त्यातून शेतकरी बांधवांनाही चार पैसे या निमित्ताने गाठीला जोडले जाऊ लागले आहेत.

या पार्टीचा माहोल कसा असतो सांगू? आपले मित्र मैत्रिणी, कुटुंबीय, सहकारी सगळे एकत्र बसलेले आहेत. फार काही तामझाम केलेला नाही. कुठल्यातरी शेतातच जमिनीवर बसण्याची सोय आहे. हा माहोल आणखी रंगततदार करायला सोबतीला हुरडा किंवा पोपटी आहे. गप्पांची मैफल जमवत लोक पार्टीचा दिलखुलास आनंद घेत आहेत. हुरडा पार्टी लोकप्रिय आहे ती मुळात पुणे आणि आसपासच्या भागात. नगरकडे जाताना फाळके वाडी, प्रवीण मसालेवाले अशा अनेकांनी उत्तम सुविधांसह हुरडा पार्टीची सोय देऊ केली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी हुरडा पार्टी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागलेल्या आहेत. जानेवारी सुरू झाल्याझाल्या हुरडा पार्टीचा हंगाम सुरू झाला असं समजायचे. पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मोठे मोठे ग्रुप, अनेक कुटुंबीय, विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते पार्टी साजरी करण्यासाठी हुरडा पार्टीच्या ठिकाणालाच पसंती देतात.

सोशल मीडियातून मार्केटिंग
डिसेंबरपासूनच हुरडा पार्टीच्या जाहिराती सुरू होतात. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आता त्याचा अतिशय नेमका आणि प्रभावी वापर मार्केटिंगसाठी केला जात असल्याचे दिसून येते. यू टय़ुबसाठी छोटेखानी व्हिडीओ करून मार्केटिंग केले जाते. त्यात हुरडा पार्टीसोबत दिल्या जाणाऱया सुविधा आवर्जून दाखवल्या जातात. याशिवाय फेसबुक, व्हॉट्स ऍपद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत जाहिरात केली जाते त्यामुळे निश्चितपणे प्रतिसाद वाढतो.
आपल्या नेहमीच्या भाकरीकरता वापरली जाणारी ज्वारी नसून सुरती जातीची ज्वारी असते. अस्सल हुरडा पार्टीत कसलीही इतर गोष्टींची भेसळ नसते. अस्सल हुरडा पार्टीत फक्त आणि फक्त हुरडा असतो. तो तसाच असायला हवा. त्याच्या जोडीला चवीला म्हणून लसूण-शेंगदाणे-तीळ चटणी, दही यांची सोबत असली की चवीचं स्वगीर्य सुख! याच्या जोडीला भजी, शेव, रेवडी, चिक्की, उसाचा रसही देतात. अनेकदा या हुरडा पार्टी रात्रीसुद्धा रंगतात. गोवऱयांच्या आगीवर भाजलेला हुरडा ताटलीत घ्यायचा आणि सोबतीला झणझणीत चटणी आणि दही असले की मग बाकी काही नको.

पुण्यातील आनंद फार्मचे राजेश कोरडे याविषयी सांगताना म्हणाले, “आता डिसेंबर संपला की आमच्याकडे बुकिंग सुरू होतील. गेली 10-15 वर्षे आम्ही करतोय, पण आता या व्यवसायाने चांगला जम बसवला आहे. लोकांना गप्पांसाठी एकत्र जमायला आवडते आणि मग अशा वेळी हुरडा पार्टीसारखे निमित्त असेल. गावासारखे शांत वातावरण असेल तर आणखीनच आनंद मिळून जातो. गेल्या तीन चार वर्षांत हुरडा पार्टीसाठी येणाऱयांचे प्रमाण खूप वाढले आहे. फलके फार्म हे नगरच्या अलीकडे 15 किलोमीटर अंतरावर आहे. अस्सल ग्रामजीवनाचा आनंद घेण्यासाठी लोक शहरातून आवर्जून इथं येतात. या फार्ममध्ये आंबा आणि चिकूची वाडीदेखील आहे. याचे मालक अशोक फलके सांगतात की, चार वर्षांपूर्वी आम्ही याची सुरुवात केली. आता मात्र त्याला फारच चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 20 एकर जागेत विस्तारलेल्या आमच्या शेतात शहरी लोकांना आवडतील अशा सुविधा देतानाच ग्रामीण बाज जपला जाईल असा आमचा प्रयत्न असतो.

इन्स्टंट हुरडा-घरपोच हुरडा!
धावपळीच्या युगात अगदीच दिवस काढून जाणे शक्य नसेल तर आता हुरडा खाण्याची हौस भागवण्यासाठी इन्स्टंट हुरडा देण्याची व्यवस्थाही काही मार्गांवर सुरू झाल्याचे दिसते. पुणे-नगर मार्गावर भाजी-फळे विक्रीसाठी जशा हातगाडय़ा लावतात त्यानुसार गाडय़ा लावून गरमागरम हुरडा गाडीतच खाण्यासही दिला जाऊ लागला आहे. याशिवाय मुंबईत राहणाऱयांना एरवी सहजासहजी हुरडा मिळणे शक्य नसते अशांसाठी घरपोच हुरडय़ाचीही सोय सुरू झाली आहे. त्यामुळे आता हुरडा घरी ऑर्डर करायचा आणि घरच्या घरीच गप्पांचा फड जमवायचा असाही नवा ट्रेंड येऊ लागला आहे.

हुरडय़ाची गावरान चव, चुलीवरच्या जेवणाची लज्जत याचा अनुभव देणाऱया ‘हुरडा पार्टी’चे वेध लागलेले दिसत आहेत. हुरडा पार्टीचे रूप आता बदलत आहे आणि ग्रामसंस्कृतीला फायदेशीर असाच हा बदल आहे.

एकुणात काय तर हुरडा पाटर्य़ा सध्या सगळ्यांना भुरळ घालीत आहेत. तेव्हा मग आता वाट कशाची पाहताय? मस्त थंडी पडलीये. मोसमही चांगला आहे. आणि तिकडे कोवळा हुरडा वाट पाहतोय. सुट्टीचा एक चांगलासा दिवस काढा आणि निघा मित्रांसह वा कुटुंबासह मोहीमेवर हुरडा पार्टीच्या… अशा आनंद देणाऱया आणि लज्जत वाढवणाऱया हुरडा पार्टीचा अनुभव तर घ्यायलाच हवा!

(लेखक मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या