
हिंदुस्थानाने हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीत सोमवारी महत्त्वाची कामगिरी बजाविली आहे. ओडिसाच्या बालसोर येथील एपीजे अब्दुल कलाम रेंज येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडी) हायपरसोनिक टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी केली आहे. या चाचणीत हवेत ध्वनीच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हिंदुस्थानाची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात असून ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करणारा हिंदुस्थान जगात चौथा देश ठरला आहे. या अगोदर अमेरिका, रशिया आणि चीनने हे तंत्रज्ञान किकासित केले आहे.
डिआरडीओने जाहीर केल्यानुसार स्कैजमेंट या इंजिनच्या मदतीने ही चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. डीआरडीओच्या या यशस्वी चाचणीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. सोमवारी सकाळी 11 वाजून तीन मिनिटांनी ही चाचणी पूर्ण करण्यात आली असून या चाचणीसाठी अग्नी मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला आहे. या चाचणीमुळे येत्या पाच वर्षात स्क्रॅमजेट इंजिनसह हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करता येणार आहे.
या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे. हायपरसॉनिक शस्त्राचा असा कुठला निश्चित मार्ग नसतो. त्यामुळे शत्रूला हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या मार्गाचा अंदाज लावता येत नाही. या टेक्नॉलॉजीचा स्पीड इतका प्रचंड असतो. शत्रूला कळण्याआधी लक्ष्यावर प्रहार करणे सहज सोप्पे होणार आहे, त्यामुळे हिंदुस्थानला याचा मोठा फायदा होणार आहे.























































