ICC Champions Trophy 2025 – सर्वोत्तम बनून मोहम्मद शमी परतलाय

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेत आपणच ‘आयसीसी’ स्पर्धेतील खरे ‘चॅम्पियन’ असल्याचे मोहम्मद शमीने दाखवून दिलेय. दुखापतीतून सावरणे हे शमीसाठी सोपे नव्हते. मात्र, शमीच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. दुखापतीतून तो नुसता सावरलाच नाही, तर सर्वोत्तम बनून त्याने पुनरागमन केलेय. कालच्या सामन्यात शमीने ते सिद्धही केलेय, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने शमीचे काौतुक केलेय.

पाकिस्तान आणि दुबई येथे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगला असून, काल हिंदुस्थानने बांगलादेशचा पराभव करत स्पर्धेची धडाक्यात सुरुवात केली. मात्र, जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाल्याने हिंदुस्थानची गोलंदाजी कमपुवत झाल्याची चर्चा होती. हिंदुस्थानची गोलंदाजीची जबाबदारी कोण खांद्यावर घेणार, असा प्रश्न असतानाच शमीने ही जबाबदारी पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर घेत हिंदुस्थानची गोलंदाजी ही कमपुवत नसल्याचे इतर संघांना दाखवून दिले.