
चार जानेवारी पासून सुरू असलेला बांगलादेशच्या हायवोल्टेज ड्राम्याला ICC ने फुलस्टॉप लावला आहे. ICC ने अधिकृत पत्र जारी करत बांगलादेशची ICC T20 World Cup 2026 मधून हकालपट्टी केली आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडची वर्णी लागली असून स्कॉटलंडचा संघ अधिकृतरित्या टी20 वर्ल्ड कपसाठी आता पात्र ठरला आहे.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला IPL 2026 मधून बाहेर काढाण्यात आलं. त्यानंतर सुरक्षेचा मुद्धा पुढे करत वर्ल्ड कपचे सामने हिंदुस्थानात न खेळवता श्रीलंकेत खेळवावे, अशी मागणी बांगलादेशने केली होती. मात्र, ICC ने मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे बांगलादेशने टी20 वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ICC ने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला 24 तासांच्या आत हिंदुस्थानात येण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसा इमेल बांगलादेश क्रिकेड बोर्डाच्या अध्यक्षांना पाठवण्यात आला होता. मात्र, बांगलादेशने 24 तासांत त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ICC ने कारवाई करत आगामी टी20 वर्ल्ड कपमधून बांगलादेशचा पत्ता कट केला आहे. यामुळे स्कॉटलंडची वर्ल्ड कपमध्ये एंट्री झाली आहे.
बांगलादेशच्या जागी ग्रुप सी मध्ये आता स्कॉटलंडचा समावेश करण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार स्कॉटलंडचे सामने कोलकाता आणि मुंबईमध्ये खेळले जाण्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारी वेस्टइंडिजविरुद्ध, 9 फेब्रुवारी इटलीविरुद्ध, 14 फेब्रुवारी इंग्लंडविरुद्ध आणि 17 फेब्रुवारी नेपाळविरुद्ध स्कॉटलंडचे सामने होण्याची शक्यता आहे. यापैकी नेपाळविरुद्धचा सामना मुंबईमध्ये आणि बाकी उर्वरित सामने कोलकातामध्ये खेळले जाणार आहेत.
























































