ICC Men’s T20 WC – बहिष्काराचा फटका! बांगलादेशी पत्रकारांची मान्यता रद्द

टी-20 वर्ल्ड कपचे वाद आता अधिक तीव्र होत असून बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) स्पर्धेवर बहिष्कार टाकल्याचा थेट फटका बांगलादेशी पत्रकारांना बसला आहे. हिंदुस्थानमध्ये होणाऱ्या या विश्वचषकाचे वार्तांकन करण्यासाठी अर्ज केलेल्या अनेक बांगलादेशी पत्रकारांची माध्यम मान्यता रद्द करण्यात आली होती. मात्र आयसीसीने या प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याने पत्रकारांना दिलासा मिळाला आहे.

आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जांची संख्या मोठी असून स्पर्धेच्या वेळापत्रकातही बदल झाल्याने माध्यम मान्यता प्रक्रिया नव्याने राबवली जात आहे. त्यानुसार यापूर्वी अर्ज केलेल्या पत्रकारांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज सादर करावे लागणार आहेत.

टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशातून सुमारे 80 ते 90 पत्रकारांनी माध्यम मान्यतेसाठी अर्ज केले होते, मात्र देशनिहाय कोटा प्रणालीमुळे एका देशातून जास्तीत जास्त 40 पत्रकारांनाच मान्यता देता येते.

या निर्णयावर बीसीबीने आक्षेप घेत आयसीसीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. मंडळाच्या माध्यम विभागाने हा विषय अंतर्गत आणि गोपनीय असल्याचे सांगत निर्णयामागील कारण जाणून घेण्याची मागणी केली आहे.