सरत्या वर्षात कोहलीच नंबर वन

316

‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली ‘आयसीसी’ कसोटी फलंदाजी क्रमवारीत ‘नंबर वन’ स्थानावर राहूनच 2019 या सरत्या वर्षाला निरोप देणार आहे. मात्र अजिंक्य रहाणेला एका स्थानाचा फटका बसून त्याची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.

विराट कोहली 928 गुणांसह कसोटीच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ कोहलीपेक्षा 17 गुणांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन 864 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहत सरत्या वर्षाला बाय बाय करणार आहे. चेतेश्वर पुजाराने 791 गुणांसह चौथे स्थान कायम राखले. पाकिस्तानच्या बाबर आझमने श्रीलंकेविरुद्धच्या कराची कसोटीत नाबाद शतक व 60 धावांची खेळी करत तीन स्थानाने प्रगती करताना सहाव्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे अजिंक्य रहाणेची सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी घसरण झाली. टॉप-20 मध्ये मयांक अग्रवाल (12 वे स्थान), रोहित शर्मा (15 वे स्थान) या हिंदुस्थानी फलंदाजांचा समावेश आहे.

गोलंदाजी क्रमवारीत हिंदुस्थानचा जसप्रीत बुमराह सहाव्या स्थानावर आहे. तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून संघाबाहेर आहे. गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा दुसऱ्या स्थानावर असून वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर अव्वल स्थानावर आहे. याचबरोबर कसोटी क्रमवारीत ‘टीम इंडिया’ 360 गुणांसह अव्वल स्थानी कायम असून ऑस्ट्रेलिया (216), पाकिस्तान (80), श्रीलंका (80), न्यूझीलंड (60) व इंग्लंड (56) अनुक्रमे दोन ते सहा स्थानावर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या