आयसीसी म्हणते ‘आम्ही असमर्थ’, पाकिस्तानी क्रिकेट संघावर बंदी घालण्यास नकार

36

सामना ऑनलाईन । दुबई

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य आम्हीही जाणतो. पण दहशतवादाच्या मुद्द्यावर एखाद्या देशाच्या संघावर जागतिक बंदी घालणे आमच्या हातात नाही. ते त्या-त्या देशांच्या सरकारचे काम आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाचे समर्थन करतोय या हिंदुस्थानच्या आरोपावरून पाकिस्तानी संघाला विश्वचषकात अथवा जागतिक क्रिकेटमधून बाहेर काढता येणार नाही. आमच्या संघटनेच्या नियमांत अथवा क्षमतेत असा बहिष्कार घालणे शक्य नाही असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या कार्यकारी समिती बैठकीत केले. बीसीसीआयच्या मागणीला नकार देताना क्रिकेटच्या या शिखर संघटनेने “हम विवश है पुत्र” अशी महाभारतातील भीष्म पितामहांसारखी भूमिका घेतली.

बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहून पुलवामा दहशतवादी हल्ल्याला खतपाणी घालणाऱ्या संघांना जागतिक क्रिकेटमधून बाहेर काढा आणि दहशतवादाविरोधातील लढाईला ठाम पाठिंबा द्या अशी मागणी आयसीसीला केली होती.पण आपल्या संघटनेच्या घटनेत अथवा नियमांत एखाद्या संघावर अशा कारणासाठी बंदी घालण्याची तरतूद नाही असे स्पष्ट करीत आयसीसीच्या कार्यकारी समितीने बैठकीत हिंदुस्थानच्या मागणीला नकार दिला.येत्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाने खेळावे की नाही ? याचा निर्णय हिंदुस्थानी सरकारच घेईल आणि आम्ही सरकारच्या निर्णयाला बांधील आहोत याचा पुनरुच्चार बीसीआयच्या प्रशासकीय समितीने आयसीसी बैठकीनंतर केला आहे.

पाकिस्तानवरील बंदीबाबत चर्चाच नाही
आयसीसीच्या कार्यकारी समितीची बैठक दुबईत परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.बीसीसीआयने पाकिस्तानचा नामोल्लेख न करता दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना जागतिक क्रिकेटमधून बहिष्कृत करा अशी मागणी केली होती. बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व बोर्डाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी केले होते. पण दहशतवादासारख्या मुद्द्यावर पाकिस्तानसारख्या संघांवर बहिष्कार टाकण्याबाबत विस्तृत चर्चा न करता आयसीसीने अशी मागणी साफ फेटाळून लावली.

आपली प्रतिक्रिया द्या