कमिन्स सुसाट, ऑस्ट्रेलिया नॉनस्टॉप; कमिन्सच्या हॅटट्रिकने ऑस्ट्रेलियाचा सलग पाचवा विजय

पॅट कमिन्सच्या हॅटट्रिकच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययामुळे बाधित सामन्यात बांगलादेशचा डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी पराभव करत टी-20 वर्ल्ड कपमधील आपला सलग पाचवा विजय नोंदवला. आता ऑस्ट्रेलियाला उद्या अफगाणिस्तानला पराभूत करत विजयाच्या षटकारासह उपांत्य फेरीत धडक मारण्याची सुवर्णसंधी आहे.

आज ऑस्ट्रेलियन माऱ्यापुढे बांगलादेशची फलंदाजी सक्षमपणे उभीच राहू शकली नाही. कर्णधार नजमल हुसेन शांतो आणि तौहीद हृदॉय यांच्या धावांच्या चाळिशीने बांगलादेशला 140 धावांपर्यंत मजल मारून दिली. पण या दोघांच्या खेळीनंतर बांगलादेशचा डाव कोलमडला. बांगलादेशचे 141 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियन सलामीवीरांच्या सुसाट फलंदाजीमुळे हवेतच उडून गेले. त्यातच पावसाच्या व्यत्ययामुळे 2 बाद 100 या धावसंख्येवर खेळ थांबला तो थांबलाच. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 28 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

हेड-वॉर्नरची तुफान फटकेबाजी

मैदानात पावसाची बॅटिंग सुरू होण्याआधी ट्रव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी जोरदार फटकेबाजी करत 6 षटकांत बिनबाद 64 धावा ठोकून काढल्या होत्या. मात्र पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळ सुरू झाला आणि ऑस्ट्रेलियाने हेड आणि मिशेल मार्शची विकेट गमावली. त्यानंतर वॉर्नरने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत 11व्या षटकात धावांची शंभरी गाठली. वॉर्नरने स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक साकारताना 35 चेंडूंत नाबाद 53 धावा ठोकल्या. त्याने शेवटच्या 3 षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया 28 धावांनी आघाडीवर होता आणि मुसळधार पावसानंतर ऑस्ट्रेलियाला तितक्याच धावांनी विजयी घोषित केले गेले.

कमिन्सची हॅटट्रिक

बांगलादेशच्या डावाला कुणीच आकार देऊ शकला नाही. फक्त कर्णधार शांतोच्या 41 आणि हृदॉयच्या 40 धावांनी बांगलादेशला शंभरी ओलांडून दिली. स्टार्कने पहिल्याच षटकात तंझीद हसनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर शांतो आणि लिटन दासने 58 धावांची भागी केली. मात्र यानंतर बांगलादेशसाठी कुणी 20 धावांची भागीही करू शकला नाही. त्यातच पॅट कमिन्सने डावातील 17व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर मेहमदुल्लाह आणि मेहदी हसनला बाद केले. मग 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तौहीद हसनला टिपत आपली टी-20 वर्ल्ड कपमधली पहिली हॅटट्रिक साजरी केली. तो वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला. तसेच ऑस्ट्रेलियाचा तो दुसराच गोलंदाज आहे. 17 वर्षांपूर्वी ब्रेट लीने टी-20 वर्ल्ड कपमधली पहिली हॅटट्रिक घेतली होती. त्यानंतर 2021 साली कर्टिस कॅम्पर (आयर्लंड), वानिंदू हसरंगा (श्रीलंका), कगिसो रबाडा (द. आफ्रिका) यांनी हॅटट्रिक केली तर 2022च्या स्पर्धेत कार्तिक मयप्पन (यूएई) आणि जोशुआ लिटल (आयर्लंड) यांनी हॅटट्रिकचा पराक्रम केला होता. तसेच ऑस्ट्रेलियाकडून ब्रेट ली आणि कमिन्सशिवाय ऍश्टन एगर व नॅथन एलिस यांनीही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक नोंदवली आहे.