झिम्बाब्वेला विजयाचे ब्लेसिंग, टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 क्रिकेटच्या दुनियेत कोणताही संघ छोटा किंवा मोठा नसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या सात दिवसांत अनेक सामने रंगतदार झाले, पण सामन्याचा निकाल खळबळजनक लागत नव्हता. अखेर झिम्बाब्वेने ती कसर भरून काढली. झिम्बाब्वेने बलाढय़ ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी विजय मिळवित टी-20 क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते हे पुन्हा दाखवून दिले.विशेष म्हणजे ब्लेसिंग मुजरबानीच्या भेदक माऱयानेच झिम्बाब्वेला विजयाच्या ब्लेसिंग दिल्या. 17 धावांत 4 विकेट टिपणारा मुजरबानीच झिम्बाब्वेच्या सलग दुसऱया विजयाचा हीरो ठरला. 2007 नंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियावर झिम्बाब्वेने दुसऱयांदा मात केली.

झिम्बाब्वेकडून मिळालेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव अनपेक्षितपणे 19.3 षटकांत 146 धावांवरच कोसळला. या विजयासह झिम्बाब्वेने ‘ब’ गटात सलग दुसरा विजय नोंदवत दुसरे स्थान पटकावले आहे. श्रीलंका अव्वल स्थानी असून, ऑस्ट्रेलिया तिसऱया क्रमांकावर घसरला आहे. या विजयामुळे झिम्बाब्वेसाठी सुपर एटचे द्वार सताड उघडे झाले आहे. आता आयर्लंडवर मात केली तर त्यांचा संघ थेट सुपर एटमध्ये पोहोचेल. परिणामतः दुसऱया स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात चुरस रंगेल.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातच डळमळीत झाली. कर्णधार मिशेल मार्शच्या अनुपस्थितीचा आजही फटका बसला. जोश इंग्लिस (8) आणि हंगामी कर्णधार ट्रव्हिस हेड (17) यांनी 1.1 षटकात 13 धावा जोडल्या असताना मुजरबानीने इंग्लिसला बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर पॅमेरून ग्रीन आणि टिम डेव्हिड शून्यावर माघारी परतले. 25 धावांत चार विकेट गेल्यानंतर 29 धावांवर हेडही माघारी परतला आणि ऑस्ट्रेलियाची 4 बाद 29 अशी बिकट अवस्था झाली. मुजरबानी व ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत दबाव वाढवला.

बेनेटमरुमानी यांची दमदार सलामी

त्याआधी नाणेफेक गमावून फलंदाजीस उतरलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात दमदार झाली. ब्रायन बेनेट (64) आणि तडिवानाशे मरुमानी (35) यांनी 7.1 षटकांत 61 धावांची दमदार सलामी देत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दबावात टाकले. मरुमानी बाद झाल्यानंतर बेनेट आणि रायन बर्ल (35) यांनी दुसऱया विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. टी-20 वर्ल्ड कपमधील झिम्बाब्वेची दुसऱया विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी ठरली; यापूर्वीचा 62 धावांचा विक्रम मसाकाद्झा आणि टेलर यांच्या नावावर होता. बेनेटने 56 चेंडूंत आपली अर्धशतकी खेळी साकारली. त्याने शेवटी सिपंदर रझा (25) याच्या साथीने 38 धावांची भर घालत झिम्बाब्वेला 160 धावांचा टप्पा ओलांडून दिला आणि ऑस्ट्रेलियासमोर 170 धावांचे आव्हान उभे केले.

ऑस्ट्रेलियावर गट फेरीतून बाहेर पडण्याचा धोका?

‘ब’ गटातील गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या तिसऱया स्थानावर आहे. दोनपैकी एक सामना गमावल्याने त्यांच्या खात्यात 2 गुण आहेत. पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना श्रीलंका आणि ओमानविरुद्धचे सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांना प्रत्येकी एक सामना गमवावा लागेल, यासाठीही त्यांना देवाचा धावा करावा लागेल.

हिंदुस्थानपाक सामना याच मैदानावर

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा उलटफेर घडला. याच मैदानावर रविवार, 15 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला झिम्बाब्वेविरुद्ध 170 धावांचे आव्हानही पार करता आले नाही. त्यामुळे या मैदानावर हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान होणाऱया सामन्यावर अवघ्या क्रिकेट जगताची उत्पंठा टिपेला पोहोचली आहे.

मॅक्सवेलरेनशॉचा प्रतिकार; मॅक्सवेलरेनशॉने आशा वाढवल्या

ऑस्ट्रेलियाचा डाव संकटात असताना ग्लेन मॅक्सवेलकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा होती. त्याने काही वेळ झिम्बाब्वेच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला, पण 32 चेंडूंत 31 धावांवर तो बाद झाला. मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी पाचव्या विकेटसाठी 59 चेंडूंत 77 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मॅक्सवेल बाद झाल्यानंतर स्टॉयनिस (6) आणि ड्वार्शुइस (6) स्वस्तात तंबूत परतले. रेनशॉने झुंजार अर्धशतक झळकावले. त्याने 44 चेंडूंत 5 चौकार व एका षटकारासह 65 धावांची खेळी केली. मात्र, त्याला शेवटच्या फळीने साथ न दिल्याने ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला. मुजरबानीने 17 धावांत 4 फलंदाज बाद केले, तर ब्रॅड इव्हान्सने 4 षटकांत 23 धावांत 3 विकेट घेतले.