महिला विश्वचषकावर पैशांचा पाऊस, बक्षीस रकमेत 300 टक्के वाढ; जगज्जेत्यांना मिळणार 39.5 कोटी

महिला क्रिकेटचा डंका यंदा जगभर वाजणार आहे. 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला आयसीसी विश्वचषकावर आयसीसीने छप्पर फाडके पैशांचा पाऊस पाडल्यामुळे जगज्जेतेपदासाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार हे स्पष्ट झालेय. महिला विश्वचषकाच्या बक्षीस रकमेत 300 टक्के वाढ करताना जगज्जेत्यांना 39.5 कोटी रुपयांचे घसघशीत इनाम दिले जाणार असल्याची माहिती आयसीसीने दिली.

आठ महिला संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी एकूण 13.88 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 122.5 कोटी रुपये) इतकी प्रचंड रक्कम खर्च केली जाणार असल्याची माहिती आयसीसीने दिली. 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत 3.5 दशलक्ष डॉलर्स इतकी पुरस्कार रक्कम वितरित केली गेली होती. यंदा आयसीसीने 2023 मध्ये झालेल्या पुरुषांच्या आयसीसी वर्ल्ड कपपेक्षा अधिक रोख रकमेच्या पुरस्काराचा पाऊस महिला वर्ल्ड कपवर करत एक नवा विक्रमच प्रस्थापित केला आहे. या पुरस्काराच्या विक्रमी वाढीमुळे महिला क्रिकेटला वेगळीच उंची लाभली आहे. आयसीसीने पुरुषांइतकेच महत्त्व महिला क्रिकेटला दिल्याचे चित्र अवघ्या विश्वासमोर उभे राहिले आहे.

महिलांची ही 13वी विश्वचषक स्पर्धा असून या लढतीत हिंदुस्थानातील गुवाहाटी, इंदूर, नवी मुंबई आणि विशाखापट्टणम येथे खेळविल्या जाणार आहेत. तसेच श्रीलंकेतील कोलंबो येथे हायब्रीड मॉडेलनुसार पाकिस्तानच्या लढती खेळविल्या जातील. या स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानकडेच आहे. यजमान हिंदुस्थानसह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे आठ संघ आपले कौशल्य पणाला लावतील.

विजेत्यांवर धनवर्षाव

  • जगज्जेता संघ ः 39.5 कोटी रुपये (4.48 दशलक्ष डॉलर्स)
  • उपविजेता संघ ः 19.77 कोटी रुपये (2.24 दशलक्ष डॉलर्स)
  • उपांत्य फेरी गाठणारे ः प्रत्येकी 9.88 कोटी रुपये (1.12 दशलक्ष डॉलर्स)
  • 5वा व 6वा क्रमांक ः 7 लाख

डॉलर्स प्रत्येकी

  • 7वा व 8वा क्रमांक ः 2.8 लाख डॉलर्स प्रत्येकी
  • सहभागासाठी प्रत्येक संघाला ः 2.5 लाख डॉलर्स
  • गटफेरीतील प्रत्येक विजयावर ः 34,314 डॉलर्स बोनस