अमेरिकेतील रोड आयलंडमध्ये क्रीडा स्पर्धेदरम्यान गोळीबार; हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील रोड आयलंड राज्यातील पावटकेट शहरात एका आईस हॉकी स्पर्धेदरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. डेनिस एम. लिंच अरेना येथे झालेल्या या हिंसाचारात संशयित हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वेळी हा गोळीबार झाला, तेव्हा अरेनामध्ये हॉकी स्पर्धेसाठी विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होती. घटनेची माहिती मिळताच पावटकेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रमुख टीना गोंकाल्व्हेस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, या बंदूकधारी व्यक्तीने आपल्याच कुटुंबातील सदस्यांना लक्ष्य केले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मैदानाभोवतीचे रस्ते बंद करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रोड आयलंडचे गव्हर्नर डॅन मॅकी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून राज्य पोलीस स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे पीडितांसाठी आणि पावटकेट शहरासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्येही ब्राउन विद्यापीठात अशाच प्रकारची गोळीबाराची घटना घडली होती. अमेरिकेतील सार्वजनिक ठिकाणी सातत्याने होणाऱ्या या बंदुकीच्या हिंसाचारामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.