इचलकरंजीत भाजी विक्रेत्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, 13 जुलैपर्यंत तालुक्यात संपूर्ण प्रतिबंध

748

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन, शनिवारी इचलकरंजीतील 58 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. इचलकरंजीत आतापर्यंत 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या व समूह संसर्गाचा धोका पाहता इचलकरंजी नगरपरिषद, शहापूर, कबनूर, चंदूर, तारदाळ, खोतवाडी परिसरात 4 ते 13 जुलै पर्यंत नागरिकांच्या हालचाली तसेच सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी रात्री प्रतिबंध केला आहे. याबाबत इचलकरंजी येथील काही नागरिकांनी दोन दिवसापूर्वी ही मागणी केली होती.

इचलकरंजी नगरपरिषद, शहापूर, कबनूर, चंदूर, तारदाळ, खोतवाडी या परिसरात कोरोनाचे 46 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असुन,रुग्ण संख्या थोड्या कालावधीत झपाट्याने वाढली आहे. इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्रातील कुडचेमळा, दातारमळा, काडापुरे तळ, बाळ नगर, जुना चंदूर रोड, गुरुकन्नन नगर, बोंगाळे गल्ली, त्रिशुल चौक, कलानगर, रिंग रोड, गोकूळ चौक या भागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काही व्यक्तींना बाधित क्षेत्रात प्रवास केल्याचा इतिहास नसतानाही स्थानिक बाधित व्यक्तीमार्फत संसर्ग होऊन स्थानिक प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगरपरिषद हद्दीत आज अखेर एकूण 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूही झालेला आहे. येथे मोठ्या प्रमाणात यंत्रमाग व त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग आहे. रोजंदारी काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग अधिक वाढु नये तसेच नियंत्रणासाठी इचलकरंजी नगरपरिषद व परिसरातील नागरिकांच्या हालचाली व सार्वजनिक ठिकाणी नागरिक समुहाने एकत्र येण्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

यामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास, अनावश्यक हालचाली प्रतिबंधित करण्यात येत आहेत. अत्यावश्यक कारणे वा उद्योग व्यवसायाच्या कारणाव्यतिरिक्त एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. मोर्चे, सभा, आंदोलने करता येणार नाही. लग्न, मुंज, साखरपुडा, वाढदिवस आदी सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम, समारंभ, धार्मिक कार्यक्रम करता येणार नाही. स्पा, सलूनस्, ब्युटी पार्लर्स सुरु ठेवता येणार नाही. ऑटो रिक्षा, काळी पिवळी, टेंपो ट्रॅव्हलर आदी प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. हातगाडी व उघड्यावरील खाद्यपदार्थ, इतर सर्व प्रकारची खरेदी विक्री प्रतिबंधित करण्यात येत आहे. (भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंना सूट)

आमदार पुत्र आणि नातवालाही संसर्ग
तर माजी मंत्री तसेच सध्याचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या मुलांसह नातवालाही कोरोना संसर्ग झाल्याने, त्यांचे कुटुंबीय क्वारंटाईन झाले असून, त्यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या