व्होडाफोन-आयडिया 42 टक्क्यांनी महागणार, उद्यापासून कॉल आणि इंटरनेटचे दर वाढणार

1155

देशातील प्रमुख टेलिकॉम ऑपरेटनर कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडियाने आपल्या नवीन प्रीपेड प्लॅनची सोमवारी घोषणा केली आहे. या नव्या प्लॅनअंतर्गत व्हॉइस कॉल आणि डेटाचे दर 42 टक्क्यांनी महागणार आहेत. येत्या 3 डिसेंबरपासून ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे मोजावे लागणार आहेत.

व्होडाफोन-आयडिया कंपनीने याबाबतची माहिती देताना सांगितलेय की, सध्या अस्तित्वात असलेल्या अनलिमिटेड श्रेणीतील प्लॅनची जागा मंगळवारपासून नवे प्लॅन घेणार आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद बघून नवीन प्लॅन किंवा सुधारित प्लॅन आणले जाणार आहेत.

व्होडाफोन – आयडिया कंपनी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. कंपनीवर 1.17 लाख कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच सावरण्यासाठी कॉल आणि डेटा रेट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हिंदुस्थानात व्होडाफोन आयडियाचे 30 कोटी ग्राहक आहेत. त्यांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.

नवे प्लॅन

व्होडाफोन-आयडियाने सर्वात स्वस्त 19 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. यात युजर्सना अनलिमिटेड कॉल, डेटा आणि दोन दिवसांची वैधता आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये हायस्पीड डेटा आणि कॉलिंग सुविधा मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याशिवाय 28 दिवस, 84 दिवस, 365 दिवसांच्या वैधतेचे नवे प्लॅनही आहेत. 1699 रुपयांचा प्लॅनची किंमत आता 2399 रुपये झाली आहे. ही वाढ  सर्वाधिक, 41.2 टक्के आहे.

अनलिमिटेड श्रेणीतील दिवसाला 1.5 जीबी डेटा असलेला 84 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन आता 599 रुपयांना मिळेल. सध्या हा प्लॅन 458 रुपयांना मिळत आहे. म्हणजे कंपनीने 31 टक्क्यांची वाढ केली आहे. दिवसाला 1.5 जीबी डेटा देणार्‍या 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 249 रुपये होणार आहे.

299 आणि 399 रुपयांचे पॅक 3 डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, 2 जीबी डेटा दररोज, 100 एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. तर 399 रुपयांच्या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल, 3 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या