कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल; जयंत पाटील यांचे टिकास्त्र

सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत, त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. त्या बाईटमध्ये पत्रकार खोदून विचारतो मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना उत्तर मला आवश्यकता वाटत नाही, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुरुंगात असलेल्या सचिन वाझे यांच्यावर प्रतिक्रिया दिली.

जयंत पाटील म्हणाले की, वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून पत्र लिहिले आहे. गृहमंत्र्यांचा तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्र व्यवहार सुरू आहे, हे यातून दिसून येते. गृहमंत्री माझे हितचिंतक आहेत. त्यामुळे वाझे यांनी काय लिहिले ते देवेंद्र फडणवीस मला सांगतील याचा मला विश्वास आहे.

वाझे यांच्या मुलाखतीवर प्रश्न उपस्थित करताना जयंत पाटील म्हणाले की, दोन वर्षे माणूस शांत असतो अचानक तो पत्र लिहितो आणि त्याला प्रसिद्धी मिळते हा काही योगायोग नाही. वाझे यांना सरकारच्या दयेची गरज आहे. त्यामुळे सरकारला खुश करण्यासाठी त्यांना लिहावे लागत असेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली. निवडणूक आहे त्यामुळे काही लोकांनी साम, दाम, दंड, भेद वापरायचे ठरवलेले दिसतेय. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कशासाठी कोण पत्र लिहितं, कुणाच्या सांगण्यावरून लिहितंय हे महाराष्ट्रातील जनतेला कळते. जनता योग्य उत्तर देईल असेही ते म्हणाले.

कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर काही लोकांनी परिस्थिती आणखी बिकट होईल. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका. एवढीच त्यांना सुचना आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी नाव न घेता त्यांनी भाजपला चिमटा काढला.