
नुकत्याच पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडताच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या विधानामुळे पाकिस्तानची चिंता आता अधिकच वाढली आहे. रिजिजू म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे.’ त्यानंतर लगेच हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले, जर आपल्यावर कोणत्याही प्रकारचा लष्करी हल्ला झाला तर कोणताही गैरसमज किंवा शंका बाळगू नये. याला अतिशय कठोरपणे उत्तर दिले जाईल. जयशंकर यांनी नुकतेच सांगितले, त्यानंतर लगेच हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानने एकाच वेळी 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता हे जाहीर केले. हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असल्याची बातमी आता जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहीतीनुसार, सकाळी हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी देशातील अनेक ठिकाणी तैनात केलेले पाकिस्तानचे हवाई संरक्षण रडार आणि प्रणाली नष्ट केल्या. यामध्ये लाहोरची एक मोठी हवाई संरक्षण प्रणाली देखील नष्ट झाली आहे. याआधीही पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये स्फोटांच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. दिल्लीत, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्यांच्या इराणी समकक्षांना सांगत होते की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील निवासी भाग आणि विविध सीमावर्ती भागांना पाकिस्तानने कोणतेही कारण नसताना लक्ष्य केले. 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम हिंदुस्थानातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एकात्मिक काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींद्वारे हे हल्ले निष्प्रभ करण्यात आले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत जे पाकिस्तानी हल्ल्यांना पुष्टी देतात. सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी असलेल्या हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले.