
’आजच्या हिंदुस्थानमध्ये गरीबांकडे फक्त मताचा अधिकार राहिला आहे. तोही चोरीला गेला तर हातात काहीच राहणार नाही. मत गेले की रेशनकार्ड, जमीन जाणार, तुमचा सगळं काही जाणार. त्यामुळे मतांची चोरी होऊ देऊ नका,’ असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केले.
राहुल यांची मतदार अधिकार यात्रा सध्या बिहारमधील सैदपूरमध्ये आहे. तेथे जनतेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप व निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. गेल्या काही वर्षांपासून भाजप व आयोग मिळून निवडणूक चोरी करत आहेत. महाराष्ट्र, हरयाणा, मध्य प्रदेशची निवडणूक चोरली गेली. बिहारची याआधीची निवडणूकही चोरी झाली होती हेही एकदा समोर येईल, असा दावाही राहुल यांनी केला.
‘एसआयआर’वरून संसदेचे कामकाज बाधित
मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीच्या (एसआयआर) मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सुरू असलेला गदारोळ अधिवेशन संपत येत असले तरी कायम आहे. आजही दोन्ही सभागृहांत याच मुद्दय़ावरून गदारोळ झाला आणि कामकाज बाधित झाले.
निवडणूक आयुक्तांनी आता स्वतःचा पक्ष काढावा – बाळासाहेब थोरात
अहिल्यानगर ः देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यामुळे निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाला आयुक्तांनी उत्तर दिले नाही. 45 दिवसांत सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणे, डिजिटल स्वरूपातील यादी दिली नाही? कागदांचे गठ्ठे का दिले? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.