धनेगाव सोनेगाव येथील खैरी नदीपात्रातला 60 ब्रास वाळूसाठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड 

महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे २५ जणांच्या पथकाने शनिवारी रात्री तालुक्यातील धनेगाव, सोनेगाव येथील खैरी नदीपात्रातील वाळू तस्करांनी साठवून ठेवलेल्या ६० ब्रास वाळूचा साठा जप्त करून १२ टिपर व ट्रक भरून तहसील कार्यालयात आणुन टाकला आहे. या धडक कारवाई दरम्यान पोलीसांचा मोठा फौजफाटा सोबत होता. आजपर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते. या वाळूचा शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार असून या वाळूची किंमत दीड ते पावणेदोन लाख रुपये आहे.

जामखेड तालुक्यातील खैरी नदी लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची तस्करी केली जाते. या तस्करीला राजाश्रयाबरोबरच महसुलचा आशिर्वाद असल्याचे बोलले जाते. सरकारमधील संबंधित पक्षांचे कार्यकर्ते या वाळूतस्करांना प्रशासनाकडून अभय देत  असल्याचे बोलले जात आहे. वाढत्या वाळू तस्करीतून या भागात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी फोफावली आहे. खैरी नदी काठच्या गावांमध्ये वाळू तस्करांची मोठी दहशत आहे. गुंडांच्या टोळ्या अवैध शस्त्रास्त्रांसह नदीकाठच्या गावांमध्ये खुलेआम हैदोस घालत आहेत. मात्र या गुंडांच्या दहशतीमुळे स्थानिकांकडून कुठलीच तक्रार होत नसल्याने या गुंडांचे धैर्य वाढत चालले आहे. पोलीस प्रशासनही ठोस कारवाई करताना दिसत नाही.

सहा महिन्यांपुर्वी या परिसरात तहसीलदार विशाल नाईकवाडे व पथकावर वाळू तस्करांकडून हल्ला झालेला होता व यातील आरोपी जामीनावर बाहेर आलेले आहेत. गावात त्यांची मोठी दहशत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई केली.

शनिवारी दुपारी धनेगाव सोनेगाव येथील खैरी नदीपात्रात मोठा वाळू साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना पाहणीसाठी पाठवले असता बातमी खरी असल्याची खात्री पटली. यानुसार पोलीस पीएसआय नामदेव सहारे यांच्या नेतृत्वाखाली सहा पोलीस, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मंडलाधिकारी पाचरणे व गायकवाड, 12 तलाठी, तीन कोलवाल बरोबर घेऊन नदीपात्रात दाखल झाले. त्याठिकाणी जवळपास शंभर ब्रास वाळू साठा होता. एक जेसीबी 12 टिपर व ट्रक च्या साहाय्याने वाळू भरून तहसील कार्यालय आवारात आणली.   वाळू भरत आसताना तस्करांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नंबर नसलेया गाड्या सायलेन्सर काढलेल्या आवाज करत गाड्या पोलिसांच्या आसपास फिरत होत्या.

स्थानिक वाळू तस्करांच्या दहशतीमुळे जाग्यावरच लिलाव करता आला नाही. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात सर्व साठा आणून शासकीय नियमानुसार  लिलाव करण्यात येणार आहे. जो जास्त बोली लावेल त्याला लिलाव घेता येईल. या वाळूची दीड लाखापेक्षा जास्त किंमत असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. अवैध वाळू साठा ज्या शेतामध्ये होता त्या शेतमालकावर रितसर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

तहसीलदार वापरत असलेली गाडी कालबाह्य झालेली आहे. गाडीला अनेक दिवसांपासून शासकीय चालक नाही. यामुळे काम करताना अनेक अडचणी निर्माण होतात. नेमक्या वेळी कारवाई करता येत नाही अशी खंत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी व्यक्त केली.