अंधेरीत पालिका शाळेच्या जागेवरील अतिक्रमणावर हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पालिका शाळेच्या 30 हजार चौरस फुटांच्या मैदानावर करण्यात आलेल्या आठ हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने आज बुलडोझर फिरवला. संबंधित बांधकामाबाबत न्यायप्रविष्ट असणाऱ्या प्रकरणात न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली.

‘के पश्चिम’ किभागात डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या मागे पालिकेची ‘डी. एन. नगर’ पालिका शाळा आहे. या शाळेलगत शाळेचेच सुमारे 30 हजार चौरस फुटांचे खेळाचे मैदानही आहे. या मैदानाच्या सुमारे आठ हजार चौरस फुटांच्या भागावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. याबाबत उच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांत धडक कारवाई करून खेळाचे मैदान मोकळे करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलाच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईसाठी 42 पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. तसेच या कारवाईत महापालिकेचे 30 कामगार–कर्मचारी-अधिकारीदेखील सहभागी झाले होते.

संरक्षक भिंत बांधणार

परिमंडळ-4 चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे अधिक मोठे मैदान उपलब्ध होणार आहे. तसेच या मैदानावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी मैदानाच्या सीमेवर लवकरच संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.