ठाणे बीजांड बेकायदा विक्री प्रकरण – आयव्हीएफ सेंटरमध्ये अनियमितता आढळल्यास परवाना रद्द करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांचे ब्रेनवॉश करून त्यांच्या गरिबीचा फायदा घेत धोकादायकरीत्या त्यांचे बीजांड काढून विक्री करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातीलत सर्व 860 आयव्हीएफ सेंटरची पोलीस आणि आरोग्य विभागाकडून झाडाझडती घेतली जाणार असून अनियमितता आढळल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे.

ठाण्यात घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. या आयव्हीएफ सेंटरला नाशिकमध्ये कामाचा परवाना दिला असताना संबंधित रॅकेटने ठाण्यात महिलांची फसवणूक करून त्यांच्या बीजांडाची तस्करी केल्याचा आरोप त्यांनी केला. असे प्रकार रोखण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना सरकार करीत असलेल्या कारवाईची माहिती दिली. अशी बीजांडे काढण्यासाठी महिलांना आंध्रसारख्या राज्यात नेले जाते. त्या ठिकाणी बीजांडे काढल्यानंतर कोणतेही उपचारही करण्यात येत नसल्याची गंभीर स्थिती त्यांनी मांडली. असे प्रकार टाळण्यासाठी सरकार कठोर कारवाई करीत असल्याचे ते म्हणाले. अशा आयव्हीएफ सेंटरला देण्यात येणारी परवानगी ऑनलाइन केल्यानंतर त्याला महिलांचे आधार कार्डही लिंक करण्यात येईल, असे ते म्हणाले. शिवाय सर्व आयबीएफ सेंटरची झाडाझडती घेण्यात येईल, असे ते म्हणाले.