108 या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध दारु तस्करी

869

आरोग्यदृष्ट्या संकटात सापडलेल्या रुग्णाची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या 108 या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध दारु तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उजेडात आली आहे. शहरातील रामनगर पोलिसांनी बाबुपेठ भागातून 108 रुग्णवाहिकेतून सहा लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारूबंदी लागू करण्यात आली आहे. या दारूबंदीनंतर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची दारू अवैधरित्या पोचत असून या प्रकरणात आजवर हजारो आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दारुबंदीविरोधातील कारवाई सातत्याने सुरू असताना शहरातील बाबुपेठ भागातून गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने 108 रुग्णवाहिकेच्या आत दडवलेली सहा लाख रुपये किमतीची दारू जप्त केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या राहुल वानखेडे नामक चालकाला या प्रकरणी अटक केली असून एकूण 16 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एरवी शहर- जिल्ह्याच्या रस्त्यांवरून रुग्ण वाहून नेत असलेल्या या रुग्णवाहिकांच्या बाबतीत सामान्य नागरिकांच्या मनात अत्यंत करुणेची भावना असते. मात्र, याच 108 रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अशाप्रकारे दारू तस्करी होण्याची पहिलीच घटना उजेडात आली असून यापुढील काळात या रुग्णवाहिका सह सर्वच रुग्णवाहिकांची अवैध दारू तस्करीसंदर्भात तपासणी गरजेची झाली आहे.

प्रकरणात 2 आरोपी सध्या फरार असून या वाहनांचे केंद्रीकृत संचालन होत असताना रुग्ण वाहनात नसताना हे वाहन चंद्रपुरात पोचले कसे? असा सवाल उपस्थित झाला आहे. चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा हे 3 लगतचे जिल्हे दारुबंदी असलेले जिल्हे आहेत. सध्या या जिल्ह्यात यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमधून दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. मात्र जनसामान्यांना विश्वासाची असणारी 108 रुग्णवाहिका सेवा दारू तस्करीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडणे सेवेवर दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या