ओशिवरात शाळेच्या मैदानात बेकायदा मदरसा! उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

ओशिवरा येथे शाळेचे मैदान बळकावून त्यावर बेकायदेशीर मदरसा उभारण्यात  आल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात कलाकार कुनिका सदानंद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले.

ओशिवरा पश्चिम येथे प्रतीक्षा नगर शाळेच्या लगत भूखंड असून त्यावर शाळेचे विद्यार्थी खेळतात. या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले असून मदरसा बांधण्यात आला आहे. सदर भूखंड बळकावल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अंधेरी वर्सोवा वेल्फेअर रेसिडेंट असोसिएशनच्या कुनिका सदानंद यांनी अ‍ॅड. दीपेश सिरोया यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. हा भूखंड शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आरक्षित करावा, येथे उभारण्यात आलेले बांधकाम बेकायदेशीर ठरवण्यात यावे तसेच शाळेच्या वापरा नंतर सर्वसामान्यांना या मैदानाचा वापर करण्याची मुभा द्यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिकेची दखल घेत सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालावे तसेच योग्य ती कारवाई करावी असे स्पष्ट केले तसेच पालिकेने संबंधित बांधकामाचे स्वरूप तपासावे व बांधकाम बेकायदा असल्यास त्यावर कारवाई करावी, असे आदेश देत सुनावणी तहकूब केली.