पाऊस वेडा झाला, मुंबई, ठाण्यासह राज्यभरात दोन दिवस रेड अलर्ट

596

सप्टेंबरचा तिसरा आठवडा उजाडला तरीही पाऊस काही महाराष्ट्रातून काढता पाय घ्यायला तयार नाही. आता तर त्याला चक्क वेड लागलेय… कारण पुढचे दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा, बीडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारीही मुंबईतील काही भागांत पावसाने दुपारनंतर अधूनमधून जोरदार हजेरी लावली. पाच ते दहा मिनिटांसाठी आलेल्या पावसाने काही ठिकाणी पाणीच पाणी झाले. 19 सप्टेंबरनंतर पाऊस गायब होईल असे हवामान विभागाने म्हटले होते, परंतु पावसाचा जोर आणखी वाढत चालला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवातही पाऊस दांडिया घालतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

65 वर्षे जुना रेकॉर्ड मोडणार

मुंबईत 38 मिमी जरी अधिक पाऊस पडला तरीही पाऊस तब्बल 65 वर्षे जुना रेकॉर्ड मेडेल. कारण 1954 मध्ये सप्टेंबर महिन्यात 920 मिमी इतका पाऊस झाला होता. यंदा सप्टेंबरच्या पहिल्या चारच दिवसांत 400 मिमी इतका पाऊस झाला, तर संपूर्ण सप्टेंबरमध्ये 883.8 मिमी इतका पाऊस झाला. मात्र आता पाऊस 920 मिमीचाही रेकॉर्ड मोडेल अशी परिस्थिती आहे.

पावसाला झाले काय?

अरबी समुद्रात उत्तर कोकण ते दक्षिण बंदरापर्यंत तसेच मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याशिवाय अरबी समुद्रातून पुढचे दोन दिवस आर्द्रतायुक्त वारे मुंबईच्या दिशेने वाहणार असल्यामुळे मुंबईसह ठाणे, पुणे, कोकणात अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज असल्याचे कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होशाळीकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या