IMD Weather Update – पाऊस लांबणार, यंदा भारतात कडाक्याची थंडी पडणार!

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन महिन्यांत मुंबईकरांना दिलासा देणारा पाऊस पडला. देशातील इतर भागातही चांगला पाऊस होत आहे. आता यंदा संपूर्ण हिंदुस्थानात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात ला निना सक्रिय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबरसह ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी कडक उन्हाळा, त्यानंतर मुसळधार पाऊस आणि आता कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीपर्यंत यंदा कडाक्याची थंडी पडू शकते.

IMD च्या मते, ला निना सप्टेंबरमध्ये सक्रिय होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. ला निनामुळे तापमानात घट होते. दरम्यान सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ला निना सक्रिय होण्याची शक्यता 66 टक्के असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. ला निनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे पावसाळा ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या वर्षी कडक उन्हाळ्यासह पावसानेही काही भागात धुमाकूळ घातला. त्यामुळे अनेक नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत कोसळणाऱ्या पावसाचा अंदाज पाहता सप्टेंबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.