पाच दिवसांचा आठवडा लागू करा; बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला देशव्यापी संप

सरकारने एकीकडे ‘एलआयसी’, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सेबी सर्वांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला असताना बँक कर्मचाऱ्यांची गेल्या दोन वर्षांपासून केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे. याविरोधात युनायटेड फोन ऑफ बँक युनियनने निर्णायक लढय़ाची घोषणा केली असून 27 जानेवारी रोजी एकदिवसीय देशव्यापी संप जाहीर केला आहे.

2010 मध्ये बँकर्सनी पाच दिवसांच्या आठवडय़ाची मागणी तत्त्वतः मान्य करीत दोन शनिवार अर्ध्या दिवसांची सुट्टी रद्द करून उर्वरित दोन शनिवार पूर्ण सुट्टी लागू केली. त्यानंतर 11व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी तत्त्वतः मान्य करत उर्वरित दोन दिवसांच्या सुट्टीचा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल, असे मान्य केले. पुन्हा 12व्या द्विपक्ष करारात ही मागणी मान्य करत शिफारशीसह अंमलबजावणीसाठी हा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे सांगितले आणि तसा तो प्रस्ताव सरकारला सादर केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सरकारने अंमलबजावणी झालेलीच नाही.

आझाद मैदानात जोरदार आंदोलन

युनायटेड फोन ऑफ बँक युनियन्सने जाहीर केलेल्या या आंदोलनात 27 जानेवारी रोजी एकदिवसीय देशव्यापी संप जाहीर केला जाणार आहे. यामध्ये सकाळी 11 वाजता आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने बँक कर्मचारी उपस्थित राहणार असून सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करणार आहेत. शिवाय राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये संपाच्या दिवशी संपकरी संघटनांच्या वतीने निदर्शने, मेळावे, मोर्चे काढण्यात येतील.