पैलतोगे काऊ कोकताहे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपली आर्त विराणी उमटविण्यासाठी ज्ञानियाच्या राजाला काऊच जवळचा वाटला.. अतिशय लोभस आर्जव ज्ञानदेव काऊची करत आहेत.. भावार्थ दीपिका लिहून झाल्यानंतरच खरेतर ज्ञानीयानी साऱ्यातून मन हळूहळू अलिप्त करण्यास सुरुवात केली होती.. गुरु आणि मोठे बंधू निवृत्तीनाथांची आज्ञा झाल्याखेरीज मनाची घालमेल शांत होणार नव्हती.. छोटी मुक्ता.. सोपान यांच्या बाळमिठीचे काय करायचे सुचत नव्हते.. किती लहानग्या वयात पैलतीर खुणावत होता.. मनाने ग्वाही दिली होती..पण अनुबंध सुटत नव्हते.. ज्ञानदेवांचे.. मन दाटून आले होते.. आभाळ भरून आले होते.. निबिड मेघांनी मनात दाटी केली होती.. मुळचीच सन्यस्त वृत्ती अधिकच विरक्त होत होती.. ही सारी घालमेल आपल्या गुरुंपर्यंत.. भावंडांपर्यंत कशी पोहोचवावी हे त्या ज्ञानेशाला समजत नव्हते.. आणि शब्द स्फुरले पैलतीराची ओढ स्पष्ट झाली.. आणि त्यासाठी काऊ मदतीला आला..

 

  ज्ञानियांचा परीसस्पर्श लाभलेला काऊ.. पैलतीराची वाट सहज मोकळी करून देतो.. यामागे अनेक पुराणकथा आहेत.. पण या पुराणातील कथांपेक्षा मला भावले या काऊचे वास्तव असणे.. अत्यंत बुद्धिमान पक्षी.. देवाने प्रत्येक अगदी माणसासहित सर्व पशुपक्ष्याना त्यांचे स्वत:चे असे रूप, रंग दिले आहे.. आणि ते रूप रंग सारा निसर्ग अगदी विनतक्रार.. उलट मानाने मिरवतो.. पण माणसाला मात्र या निष्पाप पशु पक्ष्यांच्या रंग रूपावरून त्यांना हिणवण्याची.. त्यांच्या वैशिष्ट्याचा विनाकारण अपभ्रंश करून दुसऱ्याचा पाणउतारा करण्याची वाईट सवय आहे. काळा कावळा.. ज्ञानदेवांचा लडिवाळ काऊ.. मोक्षाची वाट सुकर करणारा तेजस्वी पक्षी.. पुराणात कावळ्याला यामाराजाचे प्रतिरूप मानले आहे.. यमराजाने कावळ्याला वरदान दिले होते की तुला दिलेले अन्न पूर्वजांच्या आत्म्याला शांती देईल.. तेव्हापासून ही प्रथा सुरु आहे..पुराणकथा.. किंवा रूढी परंपरा आपण जरा बाजूला ठेवूया.. आणि एक पक्षी म्हणून, आपल्या पर्यावरणातील एक महत्वाचा घटक म्हणून त्याचा विचार करूया.

माणसांना अत्यंत धरून राहणारा पक्षी. त्याला जरी माणसांच्या सहवासात राहायला आवडत असले तरी आपण माणसे त्याला मानवनिर्मित अन्न खायला घालून त्यांची संख्या कमी करत आहोत.. श्राद्ध पक्षाला, पिंडाला शिवायला कावळाच लागतो.. आता पितृ पक्षात त्याचा मान मोठा असतो.. पण खरेच आपण त्याचा मान, आब ठेवतो आहोत.. केवळ कावळाच नव्हे तर इतर कोणत्याही प्राणी पक्ष्यांचा आपण निसर्गाचा घटक म्हणून मान ठेवतो..हा डोळस विओचार आपल्यापैकी प्रत्येकाकडून व्हायला हवा.

 आज वाढती लोकसंख्या, वाटेल तसे मानवनिर्मित अन्न कावळ्यांना धर्माच्या नावाखाली खाऊ घालणे यातून कावळे कमी झाले आहेत. कावळे जरी माणसाना धरून राहणे पसंत करीत असले तरी ते दाट झाडीत राहतात. कारण ते मोठ्या संख्येने एकत्र राहतात. कावळे हे नैसर्गिक सफाई कर्मचारी आहेत. ते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहेत. त्यांच्याशिवाय निसर्गाचा समन्वय बिघडू शकतो. आपल्या कृतीने, वर्तनाने हा काऊ खरोखरच मोक्षाचा मार्ग दाखविणारा आहे.. फक्त हे मर्म ओळखून घेऊन आपण माणसाने सगळ्या निसर्गातील पशुपक्ष्यांशी दोस्ती केली तर खरेच हे जग सुंदर होईल.. जसे देवाला.. ज्ञानदेवांना अपेक्षित आहे तसे..