करचोरीची नोटीस अखेर मागे
आयटी कंपनी इन्फोसिसला टॅक्स चोरी केल्याप्रकरणी पाठवलेली प्री-शो कॉज नोटीस कर्नाटक जीएसटी विभागाने आज मागे घेतली. एका दिवसापूर्वीच जीएसटीने इन्फोसिस कंपनीला 32 हजार कोटी रुपयांची कर चोरी केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. ज्यात 32,403 कोटी रुपये थकबाकी असल्याचे म्हटले होते.
दुचाकीला ग्राहकांची मागणी
देशात चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी म्हणजेच बाईकला ग्राहकांची जास्त मागणी आहे. जुलै महिन्यातील आकडेवारी समोर आली असून यात मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या विक्रीत घट झाली आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्सच्या विक्रीत घसरण झाली आहे, तर दुसरीकडे बजाज ऑटोच्या दुचाकीमध्ये 18 टक्के वाढ झाली आहे.
आंध्रात कर्जासाठी मुलाचे अपहरण
आंध्रात एका फायनान्स कंपनीच्या एजंटांनी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केले. दिलेल्या मुदतीत फायनान्स कंपनीचे कर्ज फेडू शकले नाहीत म्हणून या एजंटांकडून ही कारवाई करण्यात आली. अरिगीपालम येथील कंपनीच्या कार्यालयात मुलाला ओलीस ठेवले आहे, असा आरोप मुलाची आई राजेश्वरी यांनी केला. 60,000 रुपयांचं कर्ज फेडा आणि मुलगा घेऊन जा, अशी मागणी केली आहे.
केदारनाथमध्ये लष्कराचे रेस्क्यू ऑपरेशन
केदारनाथमध्ये मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 2537 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. एसडीआरएफ सोबतच लष्कराचे चिनूक आणि एमआय-17 हेलिकॉप्टर सुद्धा बचाव कार्यासाठी मैदानात उतरले आहेत. केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता आहेत. या लोकांचा कुटुंबीयासोबतचा संपर्क तुटला आहे. भीमबली येथे अडकलेल्या 737 यात्रेकरूंना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
ट्रम्प यांना 32 कोटी डॉलरचा निधी
अमेरिकेत येत्या 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षातर्फे कमला हॅरिस मैदानात आहेत. ट्रम्प यांनी निवडणूक अभियानासाठी जुलै महिन्यात 13 कोटी डॉलरहून अधिक निधी जमवलाय. त्यामुळे 32 कोटी डॉलरचा निधी गोळा झालाय. अमेरिकेतील महान देशभक्तांकडून चांगला पाठिंबा मिळतोय. ते संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद अभियानासाठी दान देत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
अरिजीत सिंहचा ब्रिटन दौरा लांबला
बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याचा लाईव्ह कॉन्सर्ट 11 ऑगस्ट रोजी ब्रिटनमध्ये होणार होता, परंतु तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. अरिजीत सिंहची प्रकृती ठीक नसल्याने हा दौरा पुढे ढकलला आहे. अरिजीत सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. प्रिय चाहते, मला हे सांगताना अतीव दुःख होत आहे की, मला अचानक मेडिकल ट्रिटमेंटची गरज भासली, असे तो म्हणाला.
तेल अवीवला जाणारी उड्डाणे रद्द
इस्त्रायलसह मध्यपूर्व देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. इस्त्रायलचे हमासबरोबर युद्ध सुरू असून दुसरीकडे इराणसोबतचा तणाव शिगेला पोचला आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला असून तेल अवीव कडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. 8 ऑगस्टपर्यंत सर्व उड्डाणे रद्द राहणार असून त्यानंतर पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे एअर इंडियाने निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली.
एम्स जम्मूमध्ये ओपीडीची सेवा सुरू
जम्मूच्या विजयपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये गुरुवारपासून ओपीडी सेवा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकूण 239 रुग्णांनी तपासणी केली. केवळ जम्मू-कश्मीर नव्हे तर अनेक ठिकाणांहून रुग्ण तपासणीसाठी या ठिकाणी आले. पहिल्या दिवशी रुग्णालयात आलेल्या रुग्णांची व्यवस्थित तपासणी करण्यात आली, असे एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. शक्ती गुप्ता यांनी सांगितले.
1.82 लाख कोटी जीएसटी कलेक्शन
गुड्स अँड सर्विसेज टॅक्स म्हणजेच जीएसटीमुळे पुन्हा एकदा सरकारची तिजोरी भरली आहे. जुलै महिन्यात जीएसटीद्वारे 1.82 लाख कोटी रुपये मिळाले. वार्षिक आधारावर यात 10.3 टक्के वाढ झाली. आर्थिक वर्ष 2024-25 चे दुसरे सर्वात मोठे जीएसटी कलेक्शन आहे. याआधी जून 2024 मध्ये जीएसटीतून 1.74 लाख कोटी रुपये मिळाले होते. जुलैमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये सीजीएसटीद्वारे 32,386 कोटी रुपये मिळाले आहेत.