देश  विदेश – देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या सहा जिह्यांत पाऊस, वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू

बिहारची राजधानी पाटणासह एकूण सहा जिह्यांत शनिवारी पाऊस पडला. सकाळी बेतिया-बगहामध्ये जोरदार पाऊस झाला. तर मुझफ्फरपूर, रक्सौल आणि पाटणामध्ये हलक्या सरी कोसळल्या. वादळी पाऊस आणि वीज कोसळून यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गयाजीमध्ये वीज कोसळून तिघांचा, जमुईच्या चकाईमध्ये एका 15 वर्षीय मुलीचा तर अररियामध्ये वादळामुळे भिंत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने बिहारमधील 25 जिह्यांत पाऊस आणि वाऱ्याचा इशारा जारी केला होता.

हिंदुस्थानचीन सीमा व्यापार, 6 वर्षांनंतर सुरू होणार

उत्तराखंडमधील पिथौरागढ जिह्यात असलेल्या लिपुलेख खिंडीमार्गे हिंदुस्थान-चीनमधील सीमा व्यापार तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा जूनपासून सुरू होणार आहे. या दोन्ही देशामध्ये जून ते सप्टेंबरपर्यंत सीमा व्यापार चालतो. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर सीमा व्यापार सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष भटगाई यांनी दिली. परराष्ट्र मंत्रालयाने ना हरकत प्रमाणपत्र जारी केल्यानंतर ही प्रक्रिया पुढे सरकली आहे. 2019 मध्ये आलेल्या कोविडमुळे आणि त्यानंतर गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षानंतर हा व्यापार बंद करण्यात आला होता.

कोच्चीत बंद खोलीत पाच जणांचे मृतदेह आढळले

केरळच्या कोच्चीमध्ये बंद खोलीत एकाच खोलीत पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व जण भाडय़ाच्या घरात राहात होते. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन चिमुरडय़ांचा समावेश आहे. मृत कुटुंब हे मूळचे तिरुवनंतपूरमधील आहे. मागील काही महिन्यांपासून ते कोच्चीच्या वडुथला येथे एका भाडय़ाच्या खोलीत राहात होते. घरातील एका सदस्याच्या उपचारासाठी ते या ठिकाणी आले होते. या पाच लोकांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

बांगलादेशचे विदेशमंत्री हिंदुस्थान दौऱ्यावर येणार

बांगलादेशातील नवनिर्वाचित तारिक रहमान याच्या सरकारमधील विदेश मंत्री खलीलुर रहमान हे पुढील महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर येणार आहेत. हिंदुस्थानचे विदेश मंत्री एस. जयशंकर आणि बांगलादेशच्या उच्चायुक्त रियाज हमीदुल्लाह यांच्यात भेट झाल्यानंतर बांगलादेशने ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खलीलुर रहमान हे 8 एप्रिलला महासागर संमेलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत येतील. त्यानंतर ते दिल्लीहून मॉरिशसला जातील. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हे काही दिवसांपूर्वी बांगलादेश दौऱ्यावर गेले होते.